• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

किल्ले रायगडावरील सुरक्षा यंत्रणेचा पर्यटक व शिवभक्तांना फटका!

ByEditor

Apr 6, 2025

३४५व्या शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

मिलिंद माने
महाड :
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४५ व्या पुण्यतिथी निमित्ताने किल्ले रायगड येथे साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह डझनभर मंत्री किल्ले रायगडावर ११ व १२ एप्रिल रोजी येत असल्याने अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दृष्टिकोनातून किल्ले रायगडावर आत्तापासूनच सुरक्षा यंत्रणेने कब्जा करण्यास सुरुवात केल्याने त्याचा फटका किल्ले रायगड पाहण्यास येणाऱ्या शिवभक्तांसह देशाच्या व राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या पर्यटकांना बसत असल्याने सुरक्षा यंत्रणेमुळे पर्यटकांकडून नाराजीची भावना व्यक्त होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४५व्या पुण्यतिथी निमित्ताने किल्ले रायगड येथे चैत्र पौर्णिमा, शालिवाहन शके १९४७, शुक्रवार, ११ व शनिवार १२ एप्रिल रोजी राजसभेमध्ये सकाळी ११ वाजता अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, स्थानिक उत्सव समिती महाड यांच्याकडून करण्यात आले आहे

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर शुक्रवारी ११ एप्रिल रोजी रात्री सात वाजता शिवसमाधी आणि जगदीश्वर मंदिर येथे दीपवंदनाचा कार्यक्रम आहे. तर रात्री ८.३० वाजता पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या मुलाखती (राजसभेत) होतील. तर रात्री ९. ३० वाजता ‘ही रात्र शाहिरांची’ हा शाहीर सुरेश सूर्यवंशी पुणे यांचा कार्यक्रम आहे. तर रात्री १० वाजता हरी जागर श्री जगदीश्वर प्रांगणात होईल.

किल्ले रायगडावर शनिवार, १२ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता श्री जगदीश्वराची पूजा व सकाळी ६ वाजता हनुमान जयंती उत्सव तर सकाळी ८ वाजता श्री शिव समाधी येथे महापूजा तसेच सकाळी ११ वाजता राज दरबारात श्री शिव प्रतिमा पूजन होईल. या कार्यक्रमास सैन्यदल अधिकारी आणि सरदार घराणे सन्मान, गडरोहण स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा, ‘श्री शिव पुण्यस्मृती रायगड पुरस्कार’ वितरण, ‘शिवराय मुद्रा’ स्मरणिका प्रकाशन, प्रमुख पाहुणे यांचे मनोगत सकाळी १२.४५ वाजता. श्री शिवप्रतिमा पालखी मिरवणूक समाधी (राज दरबार ते शिवसमाधी), दुपारी १ वाजता श्री शिवछत्रपतींना मानवंदना (सर्व शिवभक्त व रायगड जिल्हा पोलीस), दुपारी १.३० वाजता महाप्रसाद वितरण (होळीचा माळ) अशा दोन दिवसाचा कार्यक्रम किल्ले रायगड येथे पार पडणार आहे

किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४५व्या पुण्यतिथीनिमित्ताने १२ एप्रिल रोजी होणाऱ्या कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून विशेष उपस्थिती म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्यासह आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, आदिती तटकरे, भरत गोगावले हे राज्याचे मंत्री, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार सुनील तटकरे, राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील, पेणचे आमदार रवीशेठ पाटील, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे, उरणचे आमदार महेश बालदी, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह विशेष सत्कारमूर्ती श्री शिव पुण्यस्मृती रायगड पुरस्कारप्राप्त दुर्ग अभ्यासक निळकंठ रामदास पाटील, सैन्यदल अधिकारी लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी, सरदार घराण्याचे सन्माननीय व्यक्ती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज उदयसिंह होळकर असे मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

किल्ले रायगडावर शिवपुण्यतिथीनिमित्त होत असलेल्या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याचे डझनभर मंत्री या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याने अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून केंद्रीय व राज्य सुरक्षा यंत्रणेने महाडपासून किल्ले रायगडकडे जाणाऱ्या मार्गापर्यंत तसेच किल्ले रायगड पायरी मार्ग व रोपवेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा तैनात केली आहे. या सुरक्षा यंत्रणेमुळे किल्ले रायगडावर येणाऱ्या शिवभक्त व पर्यटकांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याने अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेमुळे होत असलेल्या त्रासामुळे पर्यटक व शिवभक्तांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!