अब्दुल सोगावकर
सोगाव : जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी देखील अभ्यासात कुठेही कमी नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आजपर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून शासकीय, निमशासकीय आस्थापनेवर तसेच देशविदेशात चांगल्या हुद्द्यावर नोकरी, व्यवसाय, राजकीय व सामाजिक क्षेत्रात कामगिरी करीत आहेत. अलिबाग तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा साखर येथील विद्यार्थीनी कु. अर्वा स्मिता रविंद्र चिखले हिने नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय मंथन परीक्षेमध्ये ३०० पैकी २८८ गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. तसेच राज्यस्तरीय प्रज्ञा शोध परीक्षेत देखील ३०० पैकी २७८ गुण मिळवून राज्यात पाचव्या रॅंकमध्ये उत्तीर्ण झाली असून राज्यस्तरीय बी.डी.एस. परीक्षेत देखील १०० पैकी ८७ गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.
कु. अर्वा चिखले हिच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नुकत्याच झालेल्या केंद्रस्तरीय बाल मेळाव्यामध्ये अलिबाग पंचायत समिती गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे, गटशिक्षणाधिकारी नितिश पाटील, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी चौलकर, नागाव केंद्र प्रमुख प्राची ठाकूर, खानाव केंद्र प्रमुख किर्ती खारपाटील, शिक्षण सल्लागार समिती सदस्य नितीन पाटील, आक्षी ग्रामपंचायत सरपंच रश्मी पाटील, उपसरपंच आनंद बुरांडे, नागाव सरपंच हर्षदा मयेकर, सदस्य निरजा नाईक, सामाजिक कार्यकर्ते दिलीप फाळके, रायगड जिल्हा परिषद साखर शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पाटील यांच्या हस्ते तिचा जाहीर सत्कार करण्यात आला. विशेष बाब म्हणजे ती जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी असून तिची आई स्मिता रविंद्र चिखले या देखील त्याच शाळेत उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.
