क्रीडा प्रतिनिधी
रायगड : जिल्ह्यात क्रिकेटच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून पाच लाख रुपयांचा विकास निधी सुपूर्द करण्यात आला असल्याची माहिती आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांनी प्रसार माध्यमाना दिली. गेल्या सहा महिन्यात रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने विविध वयोगटातील मुला-मुलींच्या क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व निवड चाचणी प्रक्रिया हि स्पर्धेच्या माध्यमातून केली गेल्याने जिल्ह्यातील सर्व वयोगटातील खेळाडूंना आपल्यातील खेळाच्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी मिळाली असून स्पर्धेतील केलेल्या कामगिरीच्या जोरावर खेळाडूंची निवड जिल्ह्याच्या संघात करण्यात आली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित केलेल्या पंच व गुणलेखकांच्या परीक्षेत रायगड जिल्ह्याने ऐतिहासिक व उल्लेखनीय कामगिरी केल्याचे देखील दिसून आले आहे.
सर्व आयोजित स्पर्धांचा व रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने घेण्यात आलेल्या सर्व क्रिकेटच्या विकासाच्या संबंधीचा अहवाल तयार करून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार एमसीएने त्याची दखल घेऊन आरडीसीएच्या सर्वांगीण क्रिकेटच्या विकासासाठी पाच लाख रुपये विकास निधी मंजूर करून जिल्ह्याला सुपूर्द केला आहे. येणाऱ्या काळात एमसीए रायगड जिल्ह्यात क्रिकेटच्या मैदानासाठी सुद्धा विशेष लक्ष देऊन आर्थिक निधीची तरतूद पूर्ण करणार असल्याची माहिती अनिरुद्ध पाटील यांनी दिली. एप्रिल महिन्यात रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने जिल्ह्यातील मुला-मुलींसाठी आरडीसीए प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेचे भव्य आयोजन करणार असून स्पर्धेसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांच्यासह एमसीएचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. रायगड जिल्हाला क्रिकेटच्या विकासासाठी आर्थिक मदत केल्याबद्दल महाराष्ट्र्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार व सचिव ॲड. कमलेश पिसाळ यांचे आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील सचिव प्रदिप नाईक यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी आभार मानले आहेत.
