• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

बँक ऑफ महाराष्ट्र बोर्लीपंचतन शाखेत सुविधांची वानवा! दैनंदिन व्यवहारात स्थानिकांना होतोय त्रास

ByEditor

Apr 8, 2025

गणेश प्रभाळे
दिघी :
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील बँक ऑफ महाराष्ट्र या राष्ट्रीयकृत बँकेच्या सेवेत नेहमीच ढिसाळपणा जाणवत आहे. अशा सेवेमुळे ग्राहकांना बँकिंग व्यवहारादरम्यान वाईट अनुभव येत आहेत. सुविधांचे नेहमीच तिनतेरा वाजल्याने परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सर्वसामान्यांच्या ठेवीपासून ते दैनंदिन व्यवहारासाठी बोर्लीमधील बँक ऑफ महाराष्ट्र एकमेव शाखा आहे. त्यामुळे नेहमी गर्दी पहायला मिळते. श्रीवर्धन तालुका तसा दुर्गम भाग आहे. आजही, येथे अनेकांवर दिवसभर मोलमजुरी करून आपल कुटुंब चालवायची जबाबदारी आहे. त्यातून रक्कमेचा भरणा, केवायसी, तसेच अनेक योजनेतून मिळणारे लाभ घेण्यासाठी जेष्ठ महिला, आबाल वृद्ध रांगेत उभे राहतात. मात्र, बँकेत स्लीप भरणे इतर माहिती देण्यासाठी सुविधा नसल्याने तासनतास उभे राहून नागरिकांना मानसिक त्रास होऊन वेळ वाया जात आहे.

मागील दोन वर्षात बँक कामाचा खोळंबा होत आहे. यापुर्वी या शाखेत ७ ते ८ कर्मचारी कार्यरत होते. परंतु, आता तेथे फक्त ४ कर्मचारी काम करीत असल्याने ग्राहकांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गर्दीच्या वेळी शाखेमधे उभे राहण्यास सुद्धा जागा नसते. बँकेत रक्कम देणे व घेण्याकरीता एकच कांऊटर उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहकांना एकाच रांगेत अर्धा ते पाऊण तास उभे रहावे लागते. त्यामुळे बँकेने ग्राहकांशी सुविधापूर्ण व्यवहार करावा. अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत आहे.

बँकेत कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. गर्दीच्या तुलनेत दोन अधिकारी दोन कर्मचारी कमी पडत आहेत.
-राहुल मानवते
व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र बोर्लीपंचतन शाखा

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!