शिरसाड बौद्धवाडीतील प्रकार, घरातील महिलांनी आरडाओरड करताच चोर पसार
सलीम शेख
माणगाव : तालुक्यातील निजामपूर जवळील शिरसाड बौद्धवाडी येथील एका घरात दिवसाढवळ्या चोरी करण्यासाठी गेलेल्या चार अनोळखी मास्क लावलेल्या चोरांनी त्या घरात प्रवेश केला. त्यावेळी त्या घरातील सासू – सून यांनी या अनोळखी इसमाकडे पाहताच चोर – चोर असे आरडाओरड करताच हे चार अनोळखी इसमांनी तेथून पळ काढून पसार होण्यात यश मिळविले. या घटनेची तक्रार माणगाव पोलीस ठाण्यात संबंधित कुटुंबांनी दिली असून माणगाव पोलीस ठाण्यात अनोळखी चार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे. या घटनेमुळे निजामपूर भागात भीतीचे वातावरण पसरले असून एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेची थोडक्यात हकीकत अशी कि, शिरसाड बौद्धवाडी येथील रीना सनी शिर्के वय २६ वर्ष हि विवाहित महिला आपले पती, दीर, जावूबाई, सासू, सासरे असे घरात राहतात. दुपारची वेळ असल्याने सासरे – भिकू शिर्के, सासू – नंदा शिर्के हे दोघे हॉलमध्ये झोपले होते. रीना शिर्के यांचे पती सनी भिकू शिर्के हे कामासाठी सकाळी ८.३० वाजता कामासाठी बाहेर गेले होते. तर मोठे दीर स्वप्नील भिकू शिर्के हे कामासाठी बाहेर गेले होते. त्यामुळे घरात हि विवाहिता, सासू, सासरे, दोन मुली, असे होते. ता. ५ एप्रिल रोजी दुपारी ४.०० वाजण्याच्या सुमारास ४ अनोळखी इसम तोंडाला मास्क लावलेले घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला त्यावेळी रीना शिर्के यांना घरात कोणीतरी अनोळखी चोर शिरले असल्याचे लक्षात येताच त्यांनी चोर चोर म्हणून मोठ्याने ओरडून आजूबाजूच्या लोकांना व सासू सासऱ्यांना सावध केले. त्यावेळी हे चारही अनोळखी इसम पळून गेले. त्यावेळी सासरे भिकू शिर्के यांनी बाहेर येऊन आजूबाजूच्या शेजाऱ्यांना आवाज देवून झालेला प्रकार सांगितला. या घटनेमुळे सदर कुटुंबात घबराट निर्माण झाली असून माणगाव पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार दिली असून माणगाव पोलीस या चोरट्यांचा तपास घेत आहेत.
