• Thu. Apr 17th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगडमध्ये बाळंतिणीचा मृत्यू, कुटुंबियांचे रुग्णालयावर गंभीर आरोप

ByEditor

Apr 8, 2025

श्रीवर्धन : रायगड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभाराचा आणखी एक बळी गेला आहे. श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात एका बाळंतिणीचा हृदयविकाराच्या रुग्णवाहिकेअभावी (कार्डियाक रुग्णवाहिका) मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाळवटी येथील एका महिलेला श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर अचानक त्रास जाणवू लागला. डॉक्टरांनी तिला तातडीने अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) हलवण्याचा निर्णय घेतला. मात्र, श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयातील कार्डियाक रुग्णवाहिका बंद असल्याने प्रशासनाने तिला साध्या रुग्णवाहिकेतून अलिबागला पाठवले. अलिबाग येथे पोहोचल्यानंतर महिलेची प्राणज्योत मालवली.

मृत महिलेचे पती झाकीर वाळवटकर यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. “सिझेरियननंतर माझ्या पत्नीची तब्येत अचानक बिघडली. तिला त्वरित अलिबागच्या शासकीय रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करणे गरजेचे होते. पण कार्डियाक रुग्णवाहिका खराब असल्याने दुसरी रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आली. पण जर वेळेत कार्डियाक रुग्णवाहिका मिळाली असती, तर कदाचित माझी पत्नी वाचली असती.” असा आरोप झाकीर वाळवटकर यांनी केला.

या घटनेमुळे रायगड जिल्ह्यातील आरोग्य सुविधांची पोलखोल झाली आहे. आरोग्य यंत्रणेतील त्रुटी आणि आवश्यक सुविधांचा अभाव यामुळे पुन्हा एका महिलेचा जीव गेला आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. जिल्हा प्रशासनाने या घटनेची तातडीने दखल घेऊन आरोग्य यंत्रणेत सुधारणा करण्याची मागणी होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!