अनंत नारंगीकर
उरण : शहरातील रहदारीच्या ठिकाणी अनेक दिवसापासून पाण्याचा चेंबरच्या दुरुस्ती कामासाठी खोदकाम करून ठेवल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे रस्त्याच्या मधोमध केलेल्या खोदकामाची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
उरण नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे उरण शहर अनेक समस्यांनी ग्रासले आहे. कधी कचऱ्याच्या तर कधी वाहतूक कोंडीच्या तर कधी पाण्याच्या समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. काही दिवसपूर्वीही अशाच प्रकारे पाण्याच्या चेंबरचे खोदकाम दुरुस्तीच्या नावाखाली करून अनेक दिवस तसेच ठेवले होते. त्याचा त्रास नागरिकांना, व्यावसायिकांना झाला होता. यावेळी रस्त्याच्या मधोमध आनंद नगरकडे जाणाऱ्या रस्त्यात खोदून ठेवले आहे आणि सळई उभी केल्या आहेत. हा मार्ग नेहमी रहदारीचा आणि नागरिकांनी गजबजलेला असतो. त्यामुळे रात्री अपरात्री या खोदलेल्या चेंबरमुळे अपघात होऊ शकतो. त्यामुळे या खोदलेल्या चेंबरची दुरुस्ती त्वरित करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
असे खोदकाम करून ठेवले असेल तर त्याची पाहणी करून त्वरित दुरुस्त करण्यास सांगितले जाईल.
हरीश तेजी
उरण नगरपालिका अधिकारी
