• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सुनील तटकरेंच्या सुतारवाडीतील निवासस्थानी अमित शहांच्या शाही भोजनाच्या निमित्ताने!

ByEditor

Apr 11, 2025

राज्याच्या राजकारणात तटकरेंनी मारले एका दगडात तीन पक्षी?

मिलिंद माने
महाड :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४५व्या पुण्यतिथी कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासह केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक व्हीआयपी व्यक्ती या कार्यक्रमाला किल्ले रायगडावर हजेरी लावणार आहेत. मात्र, हा कार्यक्रम पार पडल्यानंतर ३२ रायगड लोकसभा मतदारसंघातील खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या सुतारवाडीतील निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शाही भोजनाची व्यवस्था करून राज्याच्या राजकारणात एका दगडात तीन पक्षी मारल्याची चर्चा रायगडसह संपूर्ण महाराष्ट्रात चर्चिली जाऊ लागली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले रायगडावर शनिवारी, १२ एप्रिल रोजी ३४५वा शिव पुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम पार पडत आहे. हा कार्यक्रम पहाटे पाच वाजल्यापासून दुपारी १.३० वाजेपर्यंत पार पडणार आहे. हा कार्यक्रम झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रायगडावरून थेट खासदार सुनील तटकरे व त्यांची कन्या मंत्री आदिती तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी शाही भोजनासाठी उपस्थिती दर्शवणार आहेत. त्यांच्याबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील मंत्री व रायगड जिल्ह्यासह मुंबईतील अनेक आमदार व केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यासाठी सुतारवाडी येथे चार हेलिपॅडची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर सुतारवाडीत पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

शाही भोजनानिमित्त विरोधकांना तटकरेंची चपराक?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राज्याचे मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवर सुतारवाडी येथील शाही भोजनासाठी तटकरेंच्या निवासस्थानी जाणार असल्याने जिल्ह्यात तटकरेंचाच वरचष्मा असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित होत आहे.

राज्याच्या राजकारणात हजरजबाबी असणारे रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी रायगडच्या पालकमंत्री पदावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या दावा केला असला तरी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदाला शिंदे गटाकडून होणारा विरोध पाहता अमित शहा यांची तटकरेंच्या निवासस्थानी शाही भोजनाला उपस्थिती म्हणजे आदिती तटकरे यांची रायगडच्या पालकमंत्री पदावर वर्णी लागणार असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट होत आहे. मात्र आठ दिवसांपूर्वीच अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी महाडचे आमदार व राज्याचे फलोत्पादन मंत्री गोगावले यांच्या पालकमंत्री पदाचा निर्णय अमित शहा घेतील असे बोलले होते. मात्र, तटकरे यांच्या निवासस्थानी शाही भोजनानिमित्त अमित शहांची वर्णी हे सर्व काही तटकरेंच्या बाजूने निर्णय लागल्याचे सांगून जात असल्याची चर्चा रायगडसह संपूर्ण महाराष्ट्रात चर्चिली जाऊ लागली आहे.

तटकरेंचे एका दगडात तीन पक्षी?

राज्याच्या राजकारणात हजरजबाबीपणा व मुत्सद्दीपणा हा गुण तटकरेंच्या अंगी कायम असून कोणत्या वेळेला काय करायचे याचे नियोजन तटकरेंना उत्तमरीत्या जमत असल्याचे राज्याच्या राजकारणात बोलले जात आहे. तटकरे यांच्या सुतारवाडीतील निवासस्थानी अमित शहा यांची शाही भोजनाला लागणारी उपस्थिती यावरून तटकरे जरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष असले तरी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाशी त्यांची किती जवळीक आहे हे यावरून स्पष्ट होत आहे. राज्याच्या राजकारणात त्यांची कन्या महिला व बालविकास मंत्री आहे. मात्र रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिंदे गटाचे महाडचे आमदार भरत गोगावले व अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी मात्र आदिती तटकरे यांना रायगडच्या पालकमंत्री पदाला विरोध केला आहे. रायगडचे पालकमंत्री पद रिक्त असले तरी जिल्हा वार्षिक योजनेच्या अजेंड्यावर मात्र प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या आदिती तटकरे यांनी स्वाक्षऱ्या केल्याचे शासकीय अधिकाऱ्यांकडून बोलले जात आहे. यावरून रायगडच्या पालकमंत्री या आदिती तटकरे होणार हे निश्चित मानले जात आहे.

मात्र त्याही पलीकडे जाऊन सुनील तटकरे यांनी त्यांचे सुपुत्र व रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या स्थानिक प्राधिकरणातून निवडून येणारे माजी आमदार अनिकेत तटकरे यांची पुन्हा होणाऱ्या निवडणुकीसाठी वर्णी लागणार असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट केले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यावरून अजित पवार गटाचे राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल व ३२ लोकसभेचे खासदार सुनील तटकरे या दोघांमध्ये स्पर्धा लागली आहे. त्यातच पटेल हे गुजराती समाजाचे असल्याने अमित शहांशी त्यांचे संबंध पाहता तटकरे यांनी देखील अमित शहा यांना आपल्या सुतारवाडीतील निवासस्थानी शाही भोजन करण्याचा कार्यक्रम आयोजित करून केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लावण्याचे प्रयत्न या निमित्ताने केल्याचे बोलले जात आहे.

एकंदरीत तटकरे यांनी सुतारवाडीतील निवासस्थानी शाही भोजनाचा कार्यक्रम पार पाडून एका दगडात तीन पक्षी मारल्याची चर्चा रायगडसह राज्याच्या राजकारणात चर्चिली जाऊ लागली आहे. अर्थात उद्या शाही भोजनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या रायगडात एकमेकांवर चिखलफेक होण्याची शक्यता देखील यावरून नाकारता येत नाही. कारण यापूर्वी महाविकास आघाडीमध्ये विद्यमान महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे ह्या मंत्री असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना देखील स्नेहभोजनाचे आमंत्रण देऊन सुतारवाडीतील निवासस्थानी हा भोजन सोहळा पार पडला होता. त्यानंतर पूर्वी शिवसेनेत असलेल्या रायगडातील आमदारांचा विरोध डावलून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्री पद बहाल केले होते. त्याची पुनरावृत्ती पुन्हा अमित शहा यांच्या सुतारवाडीतील शाही भोजनाने होण्याचे संकेत यानिमित्ताने प्राप्त होत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!