विनायक पाटील
पेण : तालुक्यातील वडगाव येथील घराचा असेसमेंट देण्याकरिता तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाच घेताना मळेघर ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यास रंगेहात पकडले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, तक्रारदार हे वकिल असून त्यांचे आशिल यांना कोर्टाचे कामकाजासाठी तसेच एमएसइबी येथे सादर करण्यासाठी त्यांचे वडगाव (ता. पेण, जिल्हा रायगड) येथील घराचा असेसमेंट उतारा आवश्यक असल्याने तो मिळण्याकरिता तक्रारदार यांचे अशील यांनी परमेश्वर सवाईराम जाधव (वय ४८) ग्रामपंचायत अधिकारी, मळेघर, ता. पेण, जि. रायगड यांचेकडे दिनांक 17/03/2025 रोजी अर्ज केला होता. परंतु तक्रारदार यांचे अशील हे वयोवृद्ध असल्याने त्यांनी सदर असेसमेंट कागदपत्र प्राप्त करण्यासाठी तक्रारदार यांचे नावे दिनांक10/04/2025 रोजी कुलमुक्त्यार पत्र तयार करून दिले होते. त्या अनुषंगाने तक्रारदार यांनी लोकसेवक यांना दिनांक 10/04/2025 रोजी फोनवरून संपर्क करून नमूद कामाबाबत विचारणा केली असता लोकसेवक यांनी सदर कामाकरिता तक्रारदार यांचेकडे रुपये पाच हजार रकमेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दिनांक 10/4/2025 रोजी नवी मुंबई, लाच प्रतिबंध विभाग येथे येऊन तक्रार दिली.
प्राप्त तक्रारीनुसार दिनांक 11/04/2025 रोजी शासकीय पंचा समक्ष पडताळणी करण्यात आली असता आरोपी लोकसेवक परमेश्वर सवाईराम जाधव यांनी रुपये ५ हजार लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्याप्रमाणे लागलीच करण्यात आलेल्या सापळा कारवाईदरम्यान आरोपी परमेश्वर सवाईराम जाधव यांनी 5000/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारलेनंतर रंगेहात पकडण्यात आले असून भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (सुधारित२०१८) कलम 7 अन्वये पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
