क्रीडा प्रतिनिधी
रायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२५ (पुरुष व महिला) टी-२० क्रिकेट स्पर्धा येत्या मे व जून महिन्यात होणार आहे. ह्या स्पर्धेसाठी रायगड रॉयल्सचा संघ सहभागी झाला असून संघाची निवड चाचणी रविवार, दिनांक १३ एप्रिल रोजी सकाळी ठीक ८.३० वाजल्यापासून नागोठणे येथील रिलायन्स क्रिकेट मैदानावर होणार आहे.
हि निवड चाचणी रायगड जिल्ह्यातील खेळाडूंसाठी असून पुरुषांसाठी १८ वर्षापेक्षा जास्ती वय असणाऱ्या खेळाडूंसाठी तर महिलांसाठी १६ वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या खेळाडूंसाठीच असणार आहे. निवड चाचणीसाठी सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी रंगीत गणवेश परिधान करायचा आहे व आपले आधारकार्ड घेऊन येणे आवश्यक असल्याची माहिती रायगड रॉयल्स संघाचे संघ व्यवस्थापक, दिग्दर्शक तथा माजी रणजीपटू व राजस्थान रॉयल्सचे माजी खेळाडू पराग मोरे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. रायगड रॉयल्स संघाचे प्रमुख आयोजक म्हणून महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे व माजी आमदार अनिकेत तटकरे असणार आहेत. रायगड जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी निवड चाचणी करिता उपस्थित राहण्याचे आवाहन आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदिप नाईक यांनी जिल्ह्यातील खेळाडूंना केले आहे.
