अलिबाग : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे उद्या (ता. १२ एप्रिल) रायगडच्या दौऱ्यावर येणार आहेत. रायगडला आल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या घरी स्नेहभोजनाला जाणार आहेत. रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वपूर्ण मानली जात आहे. पण, शाह यांच्या दौऱ्याच्या एक दिवस आधीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आमदाराने महायुतीच्या नेत्यांना खणखणीत इशारा दिला आहे, त्यामुळे कोकणात विशेषतः रायगडमध्ये शाहांच्या दौऱ्याआधीच महायुतीत खडाखडी रंगण्याची चिन्हे आहेत.
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांना सवाल करताना रायगड जिल्ह्याला पालकमंत्री न मिळणं ही शोकांतिका आहे का? असा सवाल केला असता त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना इशारा दिल्याचे पाहायला मिळाले. ‘अमित शाह रायगडला आल्यानंतर रायगड जिल्ह्याला न्याय मिळेल असं वाटतं आणि तो आमच्या बाजूने असेल,आम्हीही आशावादी आहोत’, असं म्हणत महेंद्र दळवी यांनी विश्वास व्यक्त केला आहे. पुढे ते असेही म्हणाले, भरत गोगावले यांच्या रूपाने रायगड जिल्ह्याला पालकमंत्री मिळेल असं वाटतं. अमित शाह रायगडावर येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दर्शनाला ते येत आहेत. ते रायगडला न्याय देतीलच कारण शिवरायांचा मावळा हे भरत गोगावले आहेत. रायगडवर नेहमीच अन्याय झालाय. पण आता रायगडला जाग आली असं म्हणता येईल, कारण भरत गोगावले यांच्यारूपाने पालकमंत्री पद घोषित होईल आणि जर भरत गोगावले यांच्याकडे पालकमंत्री पद गेलं नाही तर उठाव नक्की होणार, असा थेट इशारच महेंद्र दळवी यांनी दिला.
