रोहा : गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाला धक्के बसत आहेत. पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत सत्ताधारी पक्षात सामील होत आहेत. अलीकडेच स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केल्यानंतर आता रोहा तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनीही पक्षाला रामराम ठोकला आहे. ते लवकरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत दाखल होणार असून, येत्या १३ तारखेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे.
स्नेहल जगताप यांच्या नंतर आता समीर शेडगे यांनीही ठाकरे गटाला सोडचिट्ठी दिली आहे. त्यामुळे रायगडमधील ठाकरे गटाची ताकद आणखी कमकुवत होताना दिसत आहे. शेडगे यांनी रोहा तालुकाप्रमुख पदाचा आणि शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयाने ठाकरे गटाला रायगडमध्ये पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. यापूर्वी, महाड विधानसभेचे माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या आणि माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनीही ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांच्या पक्षांतराची चर्चा बराच काळ रायगड जिल्ह्यात सुरू होती. अखेर त्यांनी राष्ट्रवादीची वाट धरली आणि आता शेडगे यांच्या निर्णयाने ठाकरे गटाची पकड कोकणात आणखी ढिली होत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, या घडामोडींमुळे ठाकरे गटाच्या कोकणातील राजकीय प्रभावाला मोठा धक्का बसत असून, सत्ताधारी महायुतीच्या पक्षांकडे नेत्यांचा ओघ वाढताना दिसत आहे.
