घन:श्याम कडू
उरण : उरण एसटी डेपोमधून शेगावकडे जाणारी बस सेवा मंगळवार (१५ एप्रिल) पासून सुरू करण्यात आली आहे. ही सेवा नियमित स्वरूपात सुरु राहणार असून, प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे. सदर बसचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
बस दररोज सकाळी ७.१५ वाजता उरण येथून सुटणार असून, त्याच वेळेस शेगाव येथून देखील परतीची बस निघणार आहे. ही बस पनवेल, कल्याण, नाशिक, मालेगाव, धुळे, जळगाव, भुसावळ, मलकापूर, खामगाव मार्गे शेगावमध्ये पोहोचेल.
तिकीट दर पुढीलप्रमाणे : प्रौढ प्रवासी : ₹ १०६१, बालक : ₹ ५३४, ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास, महिलांसाठी ५०% तिकीट सवलत
बसचे आरक्षण ऑनलाईन (मोबाईल व संगणकीय) पद्धतीने उपलब्ध आहे. उरण ते शेगाव हे सुमारे ६५० किलोमीटरचे अंतर असून, अंदाजे १८ तासांचा प्रवास अपेक्षित आहे. उरणहून निघालेली बस मध्यरात्री १ ते १.३० च्या दरम्यान शेगावला पोहोचेल. ही सेवा सुरू झाल्यामुळे भाविक व प्रवासी वर्गात आनंद व्यक्त करण्यात येत आहे. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.
