• Sat. Mar 14th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगावच्या ऋषिकेश मालोरेला महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर!

ByEditor

Apr 16, 2025

सलीम शेख
माणगाव :
महाराष्ट्रातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा मंगळवार, दि. १५ एप्रिल २०२५ रोजी करण्यात आली. या मानाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (सन २०२३ – २४) करिता रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील न्हावे गावचे प्रसिद्ध वकील ॲड. पुंडलिक मालोरे यांचा सुपुत्र कु. ऋषिकेश पुंडलिक मालोरे याने वुशू खेळात विशेष अशी चमक तालुका, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर दाखविल्याने त्याची निवड करण्यात आली आहे. सदर पुरस्काराचे वितरण पुण्यात शुक्रवार, दि. १८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वा. बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदी मान्यवर उपस्थित राहणार असून अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर व क्रीडा आयुक्त हिरालाल सोनावणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. ऋषिकेश मालोरेला प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाल्याने त्याचे सर्व स्तरांतून अभिनंदन व कौतुक होत आहे.

ऋषिकेश मालोरे यांचे वडील पुंडलिक मालोरे हे माणगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात गेली अनेक वर्षांपासून वकिली व्यवसाय करीत आहेत. ऋषिकेश मालोरे हा त्यांचा सुपुत्र असून तो २३ वर्षांचा आहे. ऋषिकेश याचे केजी ते बारावीपर्यंतचे शिक्षण माणगाव येथील एस. एस. निकम इंग्लिश स्कुल अँड ज्युनिअर सायन्स कॉलजमध्ये झाले. त्यानंतरचे पुढील महाविद्यालयीन शिक्षण द. ग. तटकरे महाविद्यालय माणगाव येथे झाले. आता तो भारतीय विद्यापीठ पुणे येथे बीपीएडचे शिक्षण घेत आहे. ऋषिकेश हा लहानपनापासूनच बुद्धीने अत्यंत तल्लख असून त्याला खेळाची लहानपणापासूनच फार आवड आहे. शालेय स्तरापासूनच त्याने तालुका, जिल्हा व राज्य पातळीवरील अनेक मैदाने गाजविले आहेत. वुशू खेळात ऋषिकेश याने दहावीपासून जिल्हा व राज्य पातळीवर सुवर्ण पदके पटकावली असून ज्यूनिअर व सिनिअर गटात राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदके पटकावली आहेत. ज्याप्रमाणे आपल्या वडिलांनी वकिली क्षेत्रात नावलौकिक कमावले आहे, त्याप्रमाणे ऋषिकेशने शिक्षणात व क्रीडा क्षेत्रात आपले नाव उंचावले आहे. क्रीडा क्षेत्रातील वुशू खेळात ऋषिकेशला महाराष्ट्र राज्याचे वुशू असोसिएशनचे सचिव सोपान कटके, जिल्हा सचिव दत्तात्रय पाटील, स्मितील पाटील तसेच स्थानिक पातळीवर माणगाव येथील प्रसिद्ध क्रीडा शिक्षक मंदार चवरकर यांचे विशेष असे मार्गदर्शन लाभले.

आपल्याला जाहीर झालेल्या महाराष्ट्रातील प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराबाबत प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना ऋषिकेश मालोरे याने सांगितले कि, माझ्या या भरारीत माझे आई-वडील, मला घडविलेली माझी शाळा, महाविद्यालय येथील सर्व शिक्षकवर्ग त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्रात मला नेहमीच मार्गदर्शन करून पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करणारे माझे क्रीडा मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे वुशू असोसिएशनचे सचिव सोपान कटके, जिल्हा सचिव दत्तात्रय पाटील, स्मितील पाटील तसेच स्थानिक पातळीवर माणगाव येथील प्रसिद्ध क्रीडा शिक्षक मंदार चवरकर या सर्वांचे मी मनापासून ऋण व आभार व्यक्त करतो. या सर्वांनी मला सहकार्य केल्यानेच माझी आज या पुरस्कारासाठी निवड झाली असल्याचे तो म्हणाला.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!