शशिकांत मोरे
धाटाव : कोलाड पाटबंधारेच्या आंबेवाडी ते निवी कालव्याची दुरुस्ती कामे दोन-तीन वर्षे सुरू आहेत. दुरुस्ती कामे संपता संपेनात. त्यामुळे पाण्याची अद्याप शाश्वती नाही. यावर्षी वाशी, तळाघर, लांढर हद्दीतील कालव्याची दुरुस्ती कामे सुरू आहेत. एप्रिल मध्यान्ह आला तरी कामांना वेग नाही. त्यामुळे पाटबंधारे प्रशासनाचे नेमके चाललंय काय? मे अखेर तरी कालव्याला पाणी सोडणार का? असा सवाल कालव्याच्या पाण्यासाठी अविरत लढा देणाऱ्या रोह्यातील शेतकरी वर्गासाठी सक्रिय आलेल्या बळीराजा फांऊडेशनने केला आहे.
दुसरीकडे कालव्याच्या दुरुस्ती कामांचा आढावा घेतला जावा, कालव्याच्या दुरुस्ती कामांची पाहणी दौरा करावा, असे निवेदनच बळीराजा फाऊंडेशनने खा. सुनील तटकरेंना देण्याचे ठरविण्यात आले. त्यावर कालव्याची दुरुस्ती कामांचा आढावा घेण्याबाबतची चर्चा खा. तटकरेंशी बळीराजा फाऊंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मोरे, संस्थापक राजेंद्र जाधव यांनी मंगळवारी सकाळी दूरध्वनीवरून केली. त्याला प्रतिसाद देत खा. सुनील तटकरेंनी येत्या दोन तीन दिवसात तातडीने चर्चात्मक बैठक घेण्याचे ठोस आश्वासित केले. त्यामुळे बळीराजा फाऊंडेशनचे शेतकरी, विभागीय ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, कालव्याचे पाणी, दुरुस्ती कामांवर बळीराजा फाऊंडेशनची पहिलीच चर्चा तटकरेंच्या दरबारात होणार असल्याने दुरुस्ती कामांना अधिक वेग येणार, पाणी प्रश्न मार्गी लागेल, परिसर पूर्वीसारखा सुजलाम् सुफलाम् होईल असा विश्वास व्यक्त झाला. तर निवेदनातून विभागाला पाण्याची गरज, शेती रोजगार यांसह पाण्याबाबतच्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे आश्वासीत बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आंबेवाडी ते निवी कालव्याच्या पाण्यासाठी बळीराजा फाऊंडेशनने कायम आक्रमक पवित्र घेतला. पाणी नसल्याने विभागाला ऐन उन्हाळ्यात अक्षरशः अवकळा येते. विहिरी, बोअरवेल पाण्याचे स्त्रोत मृत होतात, दुबार भात शेती इतिहासजमा झाली. पोल्ट्री, भाजीपाला, बागायती यांसह गुरेढोरे, झाडे पाणीपाणी करत असतात. कालव्याच्या पाण्याची गरज ओळखून ग्रामस्थांनी आंदोलन, उपोषण केले. अखेर आज करोडो रुपयाची कालवा दुरुस्ती कामे सुरू आहेत. त्यासाठी तत्कालीन आ. जयंत पाटील यांनी विधीमंडळात प्रश्न उपस्थित केला. खा. सुनील तटकरेंनी करोडो रुपये निधी आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, दुरुस्ती कामांना वेग नसल्याने आजही शेतकरी पाण्यापासून दूर आहे. अशात खा. तटकरेंनी दुरुस्ती कामांबाबत आढावा बैठक घ्यावी अशी मागणी निवेदन बळीराजा फाऊंडेशनने देत पदाधिकाऱ्यांनी तटकरेंशी चर्चा केली. त्या चर्चेला प्रतिसाद देत तटकरेंनी तातडीने कालवा दुरुस्ती कामांबाबत आढावा चर्चा बैठक घेऊ असे आश्वासीत केले.
येत्या शनिवारी अथवा रविवारी आढावा बैठक घेण्याचे सांगण्यात आले. निवेदनात कालव्याची दुरुस्ती कामे मुख्यतः पाण्याबाबतची गरज व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, कालव्याची दुरुस्ती कामे व पाण्याबाबत आढावा बैठक घेण्याचे खा. सुनील तटकरेंनी आश्वासीत केल्याने जवळपास एक दशक कोमात गेलेल्या कालव्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकपणे मार्गी लागण्यास मदत होईल, हे ठळकपणे नमूद झाले आहे. तर शेतकरी, ग्रामस्थ यांच्या बैठकीत नेमकी काय चर्चा होते हे समोर येणार आहे.
