माणगावात रायगड जिल्ह्यातील पहिले बीएस्सी नर्सिंग कॉलेज
ॲड. राजीव साबळे यांनी व्यक्त केली कृतज्ञता
सलीम शेख
माणगाव : रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याचे कार्यक्षम आणि कार्यतत्पर खासदार सुनील तटकरे यांच्या अथक प्रयत्नानंतर माणगाव येथील शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्रीमती विठाबाई मारुती गोगावले या बीएससी नर्सिंग कॉलेजला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. अशा प्रकारचे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांची मान्यता मिळालेले रायगड जिल्ह्यातील पहिलेच कॉलेज ठरले आहे. खासदार सुनील तटकरे यांनी संस्थेचे अध्यक्ष ॲड. राजीव साबळे आणि समस्त माणगाकरांना येथील बीएससी नर्सिंग कॉलेजला मान्यता मिळवून देण्याचे वचन दिले होते. त्याची पुर्तता केल्याने ॲड. राजीव साबळे यांनी खासदार सुनील तटकरे यांची कृतज्ञता व्यक्त केली. या नर्सिंग कॉलेजला मान्यता मिळाल्यामुळे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार असून या चालू शैक्षणिक वर्षापासून बीएससी नर्सिंग कॉलेजला ६० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहेत अशी माहिती खुद्द संस्थेचे अध्यक्ष ॲड. राजीव साबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या माणगाव येथे नर्सिंग कॉलेजला मान्यता मिळाल्यामुळे माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर, रोहा, पाली सुधागड तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, दापोली, मंडणगड या तालुक्यातील बारावी विज्ञान शाखेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश मिळणार आहेत. माणगाव येथे नर्सिंग कॉलेज सुरू होत असल्याने येथील विद्यार्थ्यांना अलिबाग, मुंबई आणि पुणे येथे नाईलाजाने खर्चिक शिक्षणासाठी जावे लागणार नाही. त्यामुळे बर्याचशा विद्यार्थीनींनी माणगावातच नर्सिंग कॉलेज सुरू होणार असल्याने समाधान व्यक्त केले आहे.
दरवर्षी या भागातील सुमारे १०० ते २०० विद्यार्थीनी मुंबई, अलिबाग, पूणे आणि अन्य जिल्ह्यांत नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळविण्यासाठी धडपड करीत असतात. परंतु बर्याचशा विद्यार्थीनींना प्रवेश मिळत नाही. प्रवेश मिळाला तर राहण्याची व्यवस्था होत नाही. त्यामुळे अनेकांची इच्छा असूनही नाइलाजाने प्रवेश घेता येत नाही. हि असुविधा आणि गैरसोय लक्षात घेऊन खासदार सुनील तटकरे यांनी विशेष प्रयत्न करुन आरोग्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी माणगाव येथील नर्सिंग कॉलेजला मान्यता मिळवून दिली. त्याबद्दल रायगडच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष ॲड. राजीव साबळे यांनी खासदार सुनील तटकरे यांचे आभार व्यक्त करीत कृतज्ञता व्यक्त केली.
माणगाव येथील माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक संकुलात द.ग.तटकरे महाविद्यालय, अशोक दादा साबळे विधी महाविद्यालय, मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे सीबीएसई इंग्रजी शाळा, अशोक दादा साबळे माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय, सुधाकर शिपुरकर प्राथमिक आणि गणेश वाघरे माध्यमिक इंग्रजी शाळा असे विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहेत. आता श्रीमती विठाबाई मारुती गोगावले नर्सिंग कॉलेजला मान्यता मिळाल्यामुळे माणगावच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. या नर्सिंग कॉलेजमध्ये वस्तीगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या शैक्षणिक संकुलात सुमारे ६ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष ॲड. राजीव साबळे यांनी दिली.
विशेष म्हणजे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना भारत सरकार आणि टाटा शिष्यवृत्तीची सोय करण्यात येणार आहे. पुढील काळात ए.एन.एम. दोन वर्षे, जे.एन.एम. तीन वर्षे हे पुरक परीचारीका कोर्स सुरू करण्यात येणार आहेत. बीएससी नर्सिंग कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना महाराष्ट्र, देशात आणि परदेशात नोकरीची हमी आणि खात्री मिळत असते. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके करण्यासाठी माणगाव मधील उपजिल्हा रुग्णालय, राऊत हॉस्पीटल, अल्फा हॉस्पीटल, पनवेल येथील रुग्णालय उपलब्ध होणार आहेत. भविष्यात माणगावात मेडिकल कॉलेज आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा मानस असल्याचेही संस्थेचे अध्यक्ष ॲड. राजीव साबळे यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला संस्थेचे अध्यक्ष ॲड. राजीव साबळे, सेक्रेटरी कृष्णा भाई गांधी, शाळा समिती चेअरमन नरेंद्र गायकवाड, श्रीमती विठाबाई मारुती गोगावले बीएससी नर्सिंग कॉलेजचे चेअरमन डॉ. गौतम राऊत, प्राचार्या महरोश सनगे, नितीन बामगुडे, अंकीता साबळे, औदुंबर गायकवाड आणि पत्रकार आदी मान्यवर उपस्थित होते.