घनश्याम कडू
उरण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंत भारत क्षयरोगमुक्त करण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर २४ मार्च २०२३ पासून “क्षयरोगमुक्त पंचायत” हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला. याच उपक्रमाअंतर्गत उरण तालुक्यातील घारापुरी ग्रामपंचायतीसह एकूण २३ ग्रामपंचायतींना क्षयरोगमुक्त घोषित करून मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.

सन २०२४-२५ या कालावधीत तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींनी क्षयरोगमुक्तीच्या नामांकनासाठी आपले दावे सादर केले होते. त्यांची काटेकोर पडताळणी झाल्यानंतर २३ ग्रामपंचायती अंतिमतः क्षयरोगमुक्त म्हणून घोषित करण्यात आल्या. घारापुरी, भेंडखळ, पुनाडे, वशेणी, चिरले, धुतुम, डोंगरी, हनुमान कोळीवाडा, पाणजे, मोठीजुई, बांधपाडा, दिघोडे, करळ, नवीन शेवा, सोनारी, वेश्वि, विंधणे, जसखार, कळणबुसरे, जासई, केगाव, चिरनेर व चाणजे या ग्रामपंचायतींचा त्यात समावेश आहे. या सन्मानप्राप्त कार्यक्रमात घारापुरी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामसेवक यांनी पुरस्कार स्वीकारले.