• Thu. Jan 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

म्हसळा भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक ५० हजारांची लाच घेताना सापडला जाळ्यात!

ByEditor

Apr 18, 2025

जमिनीची मोजणी, आकारफोड व प्रतसाठी देण्यासाठी लाचेची मागणी

अमुलकुमार जैन
रायगड :
जिल्ह्यातील म्हसळा भूमी अभिलेख कार्यालयातील एका भूकरमापक कर्मचार्‍याला जमीनीची मोजणी, आकारफोड व क प्रत देण्याच्या मोबदल्यात पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुपत विभागाच्या पथकाने पकडले. विशाल भिमा रसाळ (वय-29, पद – प्रतिलिपी लिपिक तथा भूकरमापक (सर्वेअर), तालुका म्हसळा, जिल्हा रायगड (वर्ग-3) रा. मारवाडी जैन बिल्डिंग, पहिला माळा, म्हसळा पोलिस ठाणे जवळ, तालुका म्हसळा, जिल्हा रायगड.) असे लाचखोर कर्मचार्‍याचे नाव असून त्यास माणगाव बस स्थानकात पथकाने ही कारवाई करीत ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी विशाल भिमा रसाळ याच्याविरुद्ध लाचलुपत प्रतिबंधक कायद्यानुसार म्हसळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ३४ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, यातील तक्रारदार यांना अखत्यारपत्र दिलेल्या इसमाचे मौजे वरवटणे, तालुका म्हसळा येथे सर्वे क्रमांक 52/1ब या जमिनीची मोजणी आकारफोड व क प्रत देणे करिता दि. ९ एप्रिल २०२५ रोजी तक्रारदार यांचेकडे आरोपी लोकसेवक विशाल भिमा रसाळ यांनी ५०,०००/- रु. लाचेच्या रकमेची मागणी केल्याची तक्रार दि. १७ एप्रिल २०२५ रोजी प्राप्त झाली होती. सदर प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने दि. १७ एप्रिल २०२५ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान आरोपी लोकसेवक विशाल भिमा रसाळ यांनी तक्रारदार यांचेकडे जमिनीची मोजणी आकारफोड व क प्रत देणे करिता रक्कम रुपये ५०,०००/- लाचेच्या रकमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार दि. १७ एप्रिल २०२५ रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक विशाल भिमा रसाळ यांनी तक्रारदार यांचेकडून मागणी केलेली लाचेची रक्कम रुपये ५०,०००/- पंच साक्षीदार यांचे समक्ष तक्रारदार यांचेकडून माणगाव एसटी स्टँड येथे स्वीकारली असता त्यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडून ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगडचे पोलीस उप अधीक्षक शशीकांत पाडावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भिसे व पथक सहाय्यक फौजदार विनोद जाधव, अरुण करकरे, पोलीस हवालदार महेश पाटील, सागर पाटील यांनी केली. या प्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईने महसूल क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याबाबत म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

लाचलुचपत विभागाचे आवाहन

रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने खासगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगड, अलिबाग कार्यालय दुरध्वनी (02141-222331) / टोल फ्री क्र. 1064 या क्रमांकावर संपर्क साधावा.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!