कालव्याला पाणी न सोडल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान; नुकसान भरपाईची मागणी
विश्वास निकम
कोलाड : कोलाड पाटबंधारे विभागाने कालव्याच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयाचा निधी खर्च केला. परंतु अद्यापही कामे पूर्ण झाली नाहीत. याउलट काही ठिकाणी सुरु असणारे कालव्याचे पाणी यावर्षी बंद केल्याने येथील शेकडो शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
कुंडलिका सिंचनातून उजव्या तिरातून पुई गोवे गावाच्या भातशेतीला पाणीपुरवठा केला जातो. परंतु मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामामुळे महामार्गावरून जाणारा पाणीपुरवठा करणारा चेंबर ठेकेदाराच्या मनमानीमुळे तोडून टाकला. तो पुन्हा बांधून पाणी पुरवठा सुरळीत सुरु करावा यासाठी गोवे व पुई ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते. यानंतर पाटबंधारे खात्याच्या अधिकारी यांनी सदर ठिकाणी भेट दिली व नवीन बांधकाम लवकर पूर्ण करून पाणी पुरवठा सुरु केला जाईल असे आश्वासन दिले होते.
यावेळी भातशेतीला पाणीपुरवठा करणारा चेंबर बांधून देणे किंवा इतर मार्गानी भातशेतीला पाणी पुरवठा करून देणे हे काम वेळेवर झाले नाही तर येथील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी लागेल असा इशारा गोवे ग्रामपंचायतीचे सरपंच महेंद्र पोटफोडे यांच्याकडून संबंधित ठेकेदार व पाटबंधारे खात्याचे अधिकारी यांना देण्यात आला होता. यानंतर चेंबर तोडून त्याचे बांधकाम करून त्याला पाईप जोडून तो पुढील कालव्याला जोडण्यात आला, परंतु याला दोन महिने निघून गेले. यामुळे पाणी सोडण्यास उशीर झाल्यामुळे यावर्षी भातशेतीला पाणी सोडण्यात आले नाही.व नंतर पाटबंधारे खात्याकडून सांगण्यात आले की, यावर्षी कालव्याच्या दुरुस्तीची कामे केली जातील पण दरवर्षीप्रमाणे पाणी येणार म्हणून शेतकऱ्यांनी बी बियाणे व रासायनिक खते खरेदी केली व मशागतीची कामे केली. परंतु पाणी न सोडल्यामुळे गोवे व पुई येथील शेकडो शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असुन याची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
१५ वर्षांपूर्वी रोहा तालुक्यातील सर्व परिसर सुजलाम सुफलाम होता. परंतु कोलाड पाटबंधारे खात्याकडून डावा व उजव्या तीर कालव्याच्या दुरुस्तीची करोडो रुपयाची कामे गेली चार पाच वर्षांपासून सुरु आहेत, ती अद्यापही पूर्ण झाली नाहीत. यामुळे संपूर्ण रोहा तालुक्यातील भातशेती पाण्याअभावी ओसाड पडली आहे. यामुळे या परिसरातील विहिरींनी तळ गाठला आहे. काही ठिकाणी तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे तर गुरेढोरे यांनाही पिण्यासाठी पाणी मिळत नाही. यामुळे कालवा दुरुस्तीची कामे लवकरात लवकर पूर्ण करून कालव्याला पाणी सोडण्यात यावे अशी मागणी येथील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
