• Mon. Apr 21st, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

विद्युत तारा भाताच्या मळणीवर कोसळल्या; धान्य जळून खाक

ByEditor

Apr 21, 2025

विद्युत महामंडळाच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी कुटुंबावर उपासमारीची वेळ

विश्वास निकम
कोलाड :
रोहा तालुक्यातील खांब विभागातील मौजे चिल्हे येथे विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा तुटून एका शेतकऱ्यांनी आपल्या शेतात साठून ठेवलेल्या भातमळणीवर कोसळल्याने तारांच्या स्पार्कमुळे एका शेतकऱ्यांने साठवून ठेवलेली भाताची मळणी जळून खाक झाल्याची खळबळजनक घटना रविवारी, २० एप्रिल रोजी दुपारी घडली असून त्यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

तालुक्यातील तसेच खांब विभागातील मौजे चिल्हे येथील युवा शेतकरी ज्ञानेश्वर महाडिक यांनी आपल्या शेतात खरीप हंगामातील दोन एकरात भाताचे पीक काढले व त्याची मळणी आपल्या शेतात साठवून ठेवली होती. त्याच मळणीवर जिवंत विद्युत तारा तुटून कोसळल्याने खाली असलेल्या भात माळणीला आग लागली आणि त्या आगीत दोनशेहून अधिक धान्याच्या साठवलेल्या मोळ्या तर चाळीसहून अधिक क्विंटल धान्य जळून खाक झाल्याने बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

अचानक विद्युत तारा तुटून कोसळल्या आणि त्यात शेतकऱ्याची धान्याची मळणी जळून खाक झाल्याने सर्वत्र एकच संतापाची लाट उसळली आहे. विद्युत महामंडळाच्या या गलथान कारभारविरोधात येथील ग्रामस्थांनी कमालीचा संताप व्यक्त केला. घडलेल्या घटनेची माहिती मिळताच कोलाड येथील कनिष्ठ अभियंता सोबनीस यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली, तसेच शेतकऱ्याचे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. विद्युत तारा कोसळल्याने पुरवठा खंडित झाला होता. तीन ते चार तासात विद्युत मंडळाच्या कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेत उपाययोजना करुन येथील ग्रामस्थांना विद्युत पुरवठा सुरू करून दिला.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!