मोबाईलद्वारे प्राप्त माहितीवरून कर्जत रेल्वे पोलिसांची कारवाई
गणेश पवार
कर्जत : देशात मोठ्या प्रमाणात लहान मुलांची तस्करी सूरू असल्याचे प्रकार समोर येत असताना काही जागरूक नागरिकांच्या दक्षतेमुळे असे लहान मुलांच्या तस्करीचे काही प्रकार उघड होऊन पोलीसांनी कारवाई करत आरोपींना गजाआड केल्याच्या घटना समोर येत असतानाच, जागरूक नागरिकांमुळे असाच प्रकार शुक्रवार, दि. १८ एप्रिल २०२५ रोजी रात्री ९ वाजण्याचे सुमारास कर्जत रेल्वे स्थानकात उघडकीस आला. एलटीटी-चेन्नई एक्सप्रेसमधून एक इसम संशयास्पदरीतीने २९ अल्पवयीन मुलांना घेऊन प्रवास करीत असल्याचे समोर आले आहे.

एलटीटी – चेन्नई एक्सप्रेसमधून कर्जत बाजूकडील पहिल्या जनरल डब्यातून एक इसम २९ अल्पवयीन मुलांना घेऊन प्रवास करीत असल्याचा मेसेज रेल्वे पोलीस जीआरपी यांना प्राप्त होताच, कर्जत रेल्वे पोलीस जीआरपी यांनी १२१६३ डाऊन चेन्नई एक्सप्रेस ही दि. १८ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजता कर्जत रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर आली असता, प्राप्त मेसेजनुसार कर्जत रेल्वे पोलीस जीआरपीचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर इसम व २९ लहान मुलांना कर्जत रेल्वे स्थानकात उतरवून त्या इसमाची चौकशी केली असता, त्या इसमाचे नाव मो. जलालउद्दीन मो. फिदा हुसेन सि६ीकी (वय २८, व्यवसाय मदरसा शिक्षक, रा. ठी. वायगरा, वॉर्ड नं. २, पं.सं पोस्ट जोकीहाट बॉल्क, त. सिरसिया, जि. अररिया, राज्य बिहार) येथील असून सदर २९ लहान मुले ही त्यांचे आसपासच्या गावातील नातेवाईकांची मुले असल्याचे व त्यांना रायचुर कर्नाटक येथील मदरसामध्ये कुराण शरीफ व उर्दू भाषेचे शिक्षण देण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगण्यात आले.
सदर लहान मुलांच्या नातेवाईकांना कर्जत रेल्वे पोलीसांकडून संपर्क करून चौकशी करून खात्री करण्यात आली आहे. तरी देखील सदर २९ मुलांना ताब्यात घेऊन त्यांची रितसर वैद्यकीय तपासणी करून काळजी व संरक्षणार्थ त्यांना कर्जतमधील बालगृह केंद्रात सुरक्षित ठेवण्यात आले आहे. सदर प्रकरणात पुढील कार्यवाही मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे, मुंबई लोहमार्ग मध्य परिमंडळ पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक तानाजी खाडे, पोलीस निरिक्षक मुकेश ढगे करीत आहेत.
