मिलिंद माने
महाड : महाडचे ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराजांच्या मंदिरासमोर असलेल्या ऐतिहासिक तलावाच्या सुशोभिकरणाचे काम राज्य शासनाच्या “तलाव संवर्धन योजनेंतर्गत” करण्यांत येत आहे. मात्र हे काम आता निधीअभावी रखडल्याचे दिसून येत आहे. सदरचे काम शासनाकडून मंजुर करण्यात आलेल्या निधीपैकी ८७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झालेला नसल्यामुळे काम बंद असल्याची माहिती महाड नगरपालिचे अभियंता प्रविण कदम आणि मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी दिली. एकंदरीत राज्य शासनाच्या तिजोरीत खडखडाट असल्याचा फटका वीरेश्वर तलावाच्या सुशोभीकरणाला बसला आहे.

महाड पोलादपुर तालुक्याचे आराध्य दैवत असलेले श्री वीरेश्वर महाराजांचे मंदिर सुमारे ३५० वर्षापुर्वीचे शिवकालीन मंदिर असुन या मंदिरासमोर असलेल्या तळ्याचे सुशोभीकरण करण्याचे काम तीन वर्षापुर्वी हाती घेण्यात आले. सुमारे पाच कोटीपेक्षा अधिक खर्च सुशोभिकरणाला येणार आहे. या कामामध्ये तलावाच्या चारही बाजुच्या भिंती नव्याने उभारण्यांत येणार असुन सभोवताली बगीचा तयार करण्यात येणार आहे. त्याच बरोबर पथमार्ग, विद्युत रोषणाई, तलावाच्या मध्यभागी असलेला खांब इत्यादी कामे करण्याकरीता शासनाने तलाव संवर्धन योजने अंतर्गत दोन कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजुर केला आहे. यासाठी महाडचे आमदार तथा मंत्री भरत गोगावले, भाजपाचे विधान परिषदेतील गटनेते आमदार प्रविण दरेकर, खासदार सुनील तटकरे यांचे विशेष सहकार्य लाभले.

वीरेश्वर मंदिराच्या तलावाच्या सुशोभीकरणाच्या कामात सुरुवातीपासूनच काम करणाऱ्या ठेकेदाराने हलगर्जीपणा दाखवला व निकृष्ट दर्जाचे भिंतीचे बांधकाम केल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून वारंवार केला जात आहे. मात्र, याकडे नगरपालिका प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
श्री वीरेश्वर देवस्थान ट्रस्टकडून तलाव सुशोभिकरण कामाकरीता ७५ लाख रुपये शासनाकडे जमा करण्यात आले आहेत. तलावाच्या कामासाठी राज्य शासनाने निधी मंजुर केल्यामुळे सदरचे काम शासनाच्या आदेशावरुन महाड नगरपालिकेच्या मार्गदर्शनाखाली करण्यांत येत आहे. तीन वर्षापुर्वी सदरचे काम पुणे येथील कंपनीला देण्यात आले. सदर काम हे दोन टप्प्यात होत असून पहिल्या टप्प्यातील काम अपूर्ण आहे. सदरचे काम कंपनीने पूर्ण करण्यात असमर्थता दर्शविल्यानंतर अन्य ठेकेदाराकडून काम करुन घेतले जात आहे. तलावाच्या कामासंबंधी श्री वीरेश्वर देवस्थान ट्रस्टचे सरपंच दिपक वारंगे, उपसरपंच रमेश नातेकर, माजी सरपंच दिलीप पार्टे, विश्वस्थ संजय पवार, गणेश वडके यांनी तलावाच्या कामाच्या चौकशीची मागणी राज्य शासनाकडे केली असुन शासनाने तलाव सुशोभिकरणाकरीता मंजुर झालेला उर्वरित निधी त्वरीत पालिका प्रसासनाकडे जमा करावा अशी मागणी केली आहे.
श्री वीरेश्वर देवस्थान तलावाच्या सुशोभिकरणाच्या कामाकरीता पाच कोटी रुपये खर्च अपेक्षित असुन शासनाने २.५० कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. यातील ८७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाल्यानंतर काम पुन्हा सुरु करण्यात येईल त्याचबरोबर संबंधित ठेकेदाराच्या कामासंबंधी नागरिकांमध्ये नाराजी असुन काम पुर्ण करण्यास दिरंगाई झाली असल्याने त्याच्यावर कारवाई करण्यांत येइल त्याचबरोबर कामाचे ऑडिट करण्यात येईल अशी माहिती महाड नगरपालिकेचे बांधकाम अभियंता प्रविण कदम आणि मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी दिली.
| वीरेश्वर तलावाच्या कामाबाबत नगरपालिका प्रशासन वारंवार दुर्लक्ष करीत असल्याने ‘आंधळं दळतंय कुत्रं पीठ खातंय’ अशी अवस्था या कामाची झाली आहे. वारंवार नागरिकांकडून निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत ओरड होत असताना देखील नगरपालिका प्रशासन मात्र ठेकेदारावर कारवाई करण्याचे धाडस का दाखवत नाही? असा सवाल स्थानिक नागरिकांकडून विचारला जात आहे. मात्र नगरपालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे या निमित्ताने स्पष्ट होत आहे. |
