महिलांची उपस्थिती नगण्य; धाटाव, वरसेत सर्वसाधारण महिला
शशिकांत मोरे
धाटाव : रोहा तालुक्यातील सर्वच ६४ ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम मंगळवारी जाहीर झाला. प्रभारी उपविभागीय अधिकारी सायली ठाकूर, तहसीलदार किशोर देशमुख, नायब तहसीलदार निलेश गवाणकर, राजेश थोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच आरक्षण जाहीर झाले. आरक्षणात ५० टक्के महिला राज कायम राहिला.
तालुक्यातील महत्त्वाच्या वरसे, धाटाव, रोठ बुद्रुक ग्रामपंचायतीत सर्वसाधारण महिला आरक्षण पडले. त्यामुळे कोणाच्या ‘सौं’ ना लॉटरी लागेल याची उत्सुकता सुरू झाली. दुसरीकडे घटनाकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिला पुरुष समानता आणली. त्याचाच परिपाक पंचायत राज निवडणुकांत महिलांना ५० टक्के आरक्षणात लागू झाला. मात्र ग्रामीण भागातील महिलांना आजपर्यंत हक्क, अधिकाराची फारशी जाणीव नाही, हे सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रमात दिसून आले. महिलांची उपस्थिती नगण्य होती. ज्यांना सरपंच पदी ५० टक्के आरक्षण जाहीर झाले प्रत्यक्षात सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रमाला दोन तीन महिला उपस्थित होत्या. दरम्यान, अर्ध्या ग्रामपंचायतीत सर्वसाधारण महिला सरपंच आरक्षण सोडत झाल्याने इच्छुक पुरुष उमेदवारांसाठी ‘कहीं खुशी कहीं गम’ असेच झाले आहे तर वरसे, धाटाव, रोठ बुद्रुक या बलाढ्य, राजकीय संघर्षमय ग्रामपंचायतीत महिला सर्वसाधारण सरपंच सोडतीने चांगलीच रंगत येणार आहे हे अधोरेखीत झाले आहे.
तालुक्यातील सर्वच ६४ ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षण सोडतीत महिला राज ठळकदार राहिला. मात्र महिलांची उपस्थिती नगण्य राहिली, ही बाब अनेकांच्या निर्दशनास आली. त्यामुळे सरपंच आरक्षीत महिला असल्या तरी कारभार नवरोबा सांभाळतो हे पुन्हा स्पष्ट झाले. आरक्षण सोडतीला शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख ॲड. मनोजकुमार शिंदे, राष्ट्रवादीचे महेंद्र पोटफोडे, शिवसेना ठाकरे गटाचे उपतालुकाप्रमुख चंद्रकांत लोखंडे, रामचंद्र चितळकर, मारुती देवरे, यशवंत शिंदे, नरेंद्र जाधव, बाबुराव बामणे, रामा म्हात्रे व तालुक्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरक्षणात तब्बल 32 ग्रामपंचायतीत अनुसूचित जाती, जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण ठेवण्यात आले.
विरझोली, चणेरा अनुसूचित जाती महिला, न्हावे, वणी, पाटणसई, खारगाव, कोलाड अनुसूचित जमाती महिला, भिसे, दापोली, वरसगाव, गोवे, देवकान्हे, तांबडी, जामगाव, येरळ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सानेगाव अनुसूचित जाती, कोंडगाव, कडसुरे, ऐनवहाळ, धामणसई, वांगणी अनुसूचित जमाती महिला, खांब, वरवठणे, मढाली खुर्द, चिंचवली तर्फे दिवाळी, नेहरूनगर, पुई, भातसई नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण जाहीर झाले. धोंडखार, रोठ बुद्रुक, नागोठणे, खैरेखुर्द, मेढा, शेणवई, आरे बुद्रुक, कुडली, धाटाव, वरसे, तळवली तर्फे अष्टमी, महाळुंगे, पिंगळसई, तिसे, पुगाव, खांबेरे, चिंचवली तर्फे अतोणे सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्याने इच्छुक पुरुष नेत्यांचा भ्रमनिरास झाला. मुख्यतः धाटाव, वरसे, रोठ बुद्रुक ग्रामपंचायतीत कोणा महिलेला सरपंच उमेदवाराची लॉटरी लागेल? यात चर्चेला आता उधाण येणार आहे.
मालसई, रोठ खुर्द, तळाघर, वावेपोटगे, निडी तर्फे अष्टमी, पिंगोडा, आंबेवाडी, किल्ला, सारसोली, शेडसई, भालगांव, घोसाळे, संभे, कोकबण, वाशी, पहुर, ऐनघर सर्वसाधारण सरपंच आरक्षण पडल्याने इच्छुकांची भाऊगर्दी वाढणार हे अधोरेखीत झाले. दरम्यान, काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका मे अखेर, जून प्रारंभ, तर अनेक निवडणुका दिवाळीनंतर होण्याचे संकेत प्राप्त झाल्याने इच्छुक हौसे, नवशे आता तयारीला लागतील, तर धाटाव, वरसे, रोठ बुद्रुक सर्वसाधारण महिला सरपंच आरक्षण पडल्याने कोणाच्या ‘सौं’ना संधी मिळते याचीच उत्सुकता शिगेला पोचली आहे.
