• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पागोटे येथील एल अँड टी कंपनीच्या नोकरभरती वरून वाद विकोपाला!

ByEditor

Apr 23, 2025

गावातील स्थानिक बेरोजगार प्रकल्पग्रस्तांची नोकर भरती करण्याची पागोटे ग्रामपंचायतची मागणी

पत्रकार परिषद घेऊन ग्रामपंचायतने केली आपली भूमिका स्पष्ट

विठ्ठल ममताबादे
उरण :
पागोटे ग्रामपंचायत हद्दीत नव्याने कार्यरत झालेल्या एल अँड टी कंपनीत स्थानिक प्रकल्पग्रस्त बेरोजगार तरुणांची भरती न होता गावा बाहेरील इतर तरुणांची भरती केली गेली. त्यामुळे स्थानिक बेरोजगार प्रकल्पग्रस्तांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. उपजीविकेचे कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने पागोटे गावातील स्थानिक प्रकल्पग्रस्त बेरोजगार तरुणांवर उपासमारीची वेळ आली आहे. बेरोजगार प्रकल्पग्रस्त तरुणांना न्याय मिळावा, त्यांना नोकरी मिळावी या हेतूने सरपंच कुणाल पाटील व ग्रामपंचायतचे सर्व पुरुष व स्त्री सदस्य यांनी पुढाकार घेतला आहे. त्या अनुषंगाने एल अँड टी कंपनीत गेले असता सरपंच कुणाल पाटील व ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांवर प्राणघातक हल्ला झाला. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ थोडक्यात बचावले. तलवारीसारख्या धारदार शस्त्राने वार करण्यात येणार होता मात्र, सुदैवाने सर्वजण बचावले. या संदर्भात सरपंच कुणाल पाटील व ग्रामपंचायत सदस्यांनी उरण पोलीस ठाण्यात सदर प्राणघातक हल्ला करणारे व गावातील स्थानिक प्रकल्पग्रस्त बेरोजगारांची भरती न करता इतर गावाबाहेरील व्यक्तींची भरती करणारे किरण पंडित, जितेंद्र पाटील, कुंदन पाटील, सौरभ पाटील, अतिश पाटील, संतोष पाटील, योगेश शेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात सरपंच कुणाल पाटील व ग्रामपंचायत सदस्यांनी पागोटे ग्रामपंचायत मध्ये पत्रकार परिषद घेऊन सदर घटनेची माहिती दिली व सदर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

धारदार शस्त्र बाळगल्या प्रकरणी प्राणघातक हल्ला करणाऱ्या व्यक्तीविरोधात शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला नाही, कलम दाखल केले नाही, प्राणघातक हल्ला करणाऱ्यावर इतर कलम लावले त्यामुळे आरोपी मोकाट सुटून परत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर प्राणघातक हल्ला होण्याची दाट शक्यता आहे. आरोपी मोकाट सुटतील अशा प्रकारे त्यांच्यावर उरण पोलीस ठाणे मार्फत कलम लावल्याने सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त केली. त्यांच्यावर शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची मागणी सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी पत्रकार परिषदेतून केली.

पागोटे ग्रामपंचायतीची गुरचरण जमीन सर्व्हे नंबर १८१/१/१ व १८१/१/२ अशी असून सदरची जमीन ही कास्टींग यार्डच्या प्रकल्पाकरीता मेसर्स लार्सन अन्ड टुब्रो कंपनीला एमएमआरडीए यांनी दिली आहे. सदर कंपनीमध्ये स्थानिक गावकऱ्यांना नोकरी व व्यवसायाकरिता प्राधान्य देण्यात यावे म्हणुन सरपंच व ग्रामपंचायत कमिटी व गावातील ग्रामस्थ मंडळ व्यवस्थापक एल अँड टी कंपनीला दिनांक १०/०४/२०२५ रोजी गोपाल स्वरूप यांना पत्र दिले होते. त्यावेळी त्या ठिकाणी किरण हरीभाऊ पंडीत, रा. पागोटे याने त्यावेळी सरपंच यांच्याशी वादविवाद करून शिवीगाळ व धमकी दिल्याने सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी सदर दिवशी उरण पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने उरण पोलीस ठाणे येथे अदखलपात्र गुन्हा रजि. क्र. ६६१/२०२५ भा.न्या.सं. कलम ३५२,३५१ (२), १८९(२),१९० अन्वये शिवीगाळ व प्राणघातक हल्ला करणाऱ्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दिनांक २२/०४/२०२५ रोजी दुपारी १ वा. सुमारास एल एन्ड टी कास्टींग यार्ड, पागोटे, ता. उरण, जि. रायगड या ठिकाणी सरपंच , ग्रामपंचायत कमिटीचे सदस्य सुजित तांडेल, अधिराज पाटील, मयुर पाटील, सतिश पाटील, व गावातील ग्रामस्थ मंडळाचे उपाध्यक्ष बाळकृष्ण पाटील, सेक्रेटरी प्रथम तांडेल, खजिनदार श्याम पाटील व इतर गावकरी असे पुन्हा एल. अँन्ड टी. कंपनीचे व्यवस्थापक गोपाळ स्वरूप यांना लेखी पत्र देणेकरिता गेलो असता दुपारी २ वा. सुमारास त्या ठिकाणी योगेश शेट्टी हा सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना अरेरावी व एकेरी भाषेत बोलु लागल्याने सरपंच व त्यांच्या सोबतचे सर्व ग्रामस्थांनी योगेश शेट्टी यास तू गावाचे सरंपचासोबत नीट बोल व माफी मागुन आमचे पत्र स्विकार असे सांगितले असता, त्याचेसोबत असणारे किरण हरीभाउ पंडीत, जितेंद सदानंद पाटील, कुदन लक्ष्मण पाटील यांनी ते माफी मागणार नाहीत तुम्हाला काय करायचे ते करा असे सांगितले. त्यानंतर किरण पंडीत हा योगेशला घेऊन जवळच उभी असणा-या सौरभ दिलीप पाटील हा घेउन आलेला मारूती स्विफ्ट कार क्रमांक एमएच ४६ बीझेड २८१२ गाडीजवळ घेऊन गेला असता सौरभ पाटील याने गाडीची डिकी खोलुन अश्लील शिवीगाळ करत शस्त्राने वार करण्याची धमकी दिली व किरण पंडीत यांनीही अश्लील शिवीगाळ करत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांना दमदाटी केली. त्यावेळी साईराज पाटीलने हा सदरचा वाद मिटवत असताना किरण पंडीत याने साईराज पाटील याची कॉलर पकडुन ‘थांब तुला तलावर काढुन मारतो’ असे बोलुन दमदाटी केली. तेव्हा त्याला जितेंद्र सदानंद पाटील, कुंदन लक्ष्मण पाटील यांनी थांबविले. त्यावेळी तेथे उपस्थित असलेले अतिश सदानंद पाटील, संतोष विजय पाटील यांनी सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना व गावाकऱ्यांना शिवीगाळ केली. म्हणून सरपंच कुणाल पाटील व ग्रामपंचायत सदस्यांनी किरण हरिभाऊ पंडित, जितेंद्र सदानंद पाटील, कुंदन लक्ष्मण पाटील, सौरभ पाटील, अतिश सदानंद पाटील, संतोष विजय पाटील, योगेश शेट्टी यांच्या विरोधात उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सरपंच कुणाल पाटील व ग्रामपंचायत सदस्यांवर यापूर्वीही असे प्राणघातक हल्ले झाले आहेत. आता प्राणघातक हल्ल्याची ही दुसरी घटना आहे. यानंतर आता परत अशी घटना घडू नये. परत अशी घटना घडल्यास त्यात एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.त्यामुळे दहशत पसरविणाऱ्या व प्राणघातक हल्ला करणाऱ्या व्यक्तींना त्वरित अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आता सर्वत्र होऊ लागली आहे.या प्रकरणात न्याय न मिळाल्यास पोलिसांनाच सह आरोपी करून कोर्टात जाणार असल्याची व कोर्टात दाद मागणार असल्याची माहिती सरपंच कुणाल पाटील यांनी दिली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!