क्रीडा प्रतिनिधी
अलिबाग : रायगड जिल्ह्यात प्रथमच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित आंतरजिल्हा निमंत्रित (इंव्हिटेशन ट्रॉफी) सोळा वर्षाखालील मुलांच्या दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेतील पंधरा सामन्यांचे आयोजन रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने जिल्ह्यातील विविध मैदानावर करण्यात येणार आहे. त्यात प्रामुख्याने रिलायन्स क्रिकेट मैदान नागोठणे, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पेण, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट्स रसायनी पाताळगंगा, पनवेल महानगरपालिका मैदान आदई पनवेल, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण उलवे पनवेल, माजगाव क्रिकेट क्लब मैदान रोडपाली ह्या मैदानावर स्पर्धेतील सामन्याचे आयोजन करण्यात येणार असून सामन्यांचे यशस्वी आयोजन व्हावे यासाठी आरडीसीएचे सर्व पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत असल्याची माहिती आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिली.
रायगड जिल्ह्यात प्रथमच एमसीएच्या मॅचेस होत असल्याचा आपल्याला आनंद आहे. त्यासाठी आपण एमसीएचे अध्यक्ष आमदार रोहित पवार, सचिव ॲड. कमलेश पिसाळ, सदस्य सुशील शेवाळे, स्पर्धा कमिटीचे अध्यक्ष राजू काणे, सीईओ अजिंक्य जोशी व सर्व पदाधिकारी, सदस्यांचे आभार मानत असल्याचे अनिरुद्ध पाटील यांनी सांगितले. पंचवीस वर्षापूर्वी रायगड जिल्ह्यात आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेचे आयोजन होत असे, त्यात कोकण ट्रॉफी, जसदनवाला ट्रॉफी, एकोणीस वर्षाखालील मुलांसाठीची तनपुरे ट्रॉफी अशा स्पर्धेतील सामन्यांचे आयोजन रायगड जिल्ह्यात होत होते. आता आपण अनेक वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा रायगड जिल्ह्यात एमसीएच्या स्पर्धेतील सामन्यांचे आयोजन करत आहोत. स्पर्धेतील १५ दोन दिवसीय सामने रायगडमध्ये होणार असून कोल्हापूर, सातारा, रायगड, वायएमसीए क्रिकेट क्लब, युनायटेड क्रिकेट क्लब, साऊथ झोन अशा सहा संघांमध्ये साखळी फेरीतील सामने खेळवले जाणार आहेत.
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा संघ पहिल्यांदाच आपल्या घरच्या मैदानांवर खेळणार असल्याने खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याची माहिती आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांनी दिली.