• Wed. Jul 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

काश्मीरातील पाच दहशतवाद्यांची घरं ब्लास्ट करुन उद्ध्वस्त केली, पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कर आक्रमक

ByEditor

Apr 26, 2025

मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने काश्मीरमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांबाबत कठोर धोरण अवलंबल्याचं दिसून येतंय. आधी दोन दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त केल्यानंतर आता आणखी तीन दहशतवाद्यांची (Pahalgam Terrorist) घरं भारताने जमीनदोस्त केली. पुलवामा भागात एहसान उल हक शेख या दहशतवाद्याचं, कुलगाममध्ये झकीर अहमद गानियाचं तर शोपियाँमध्ये शाहीद अहमद कुटे या दहशतवाद्याचं घर पाडण्यात आलं. दरम्यान शुक्रवारी आसिफ शेख आणि आदिल गुरी याचं घर पाडलं होतं.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्यानंतर भारताकडून आक्रमक पाऊलं उचलली जात आहेत. सोफियान येथील छोटीपूरा येथील लष्कर ए तोएबा या संघटनेत सक्रिय असलेल्या शाहिद अहमद कुट्टी याचे घर आयआयडी ब्लास्ट लावून उडवण्यात आले. शहिद हा मागील दोन वर्षापासून या संघटनेत सक्रिय असल्याची माहिती आहे. त्याचा भाऊही दोन वर्षापासून तुरूंगात असल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली.तर शाहिदचे वडील हे सध्या ताब्यात आहेत. तपास यंत्रणेचे अधिकारी काल शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास आले होते. कुटुंबीयांना ताब्यात घेतल्यानंतर रात्री 1 च्या सुमारास या दहशतवाद्यांच्या घरी ब्लास्ट करून ते उद्ध्वस्त करण्यात आलं.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराचे जवान अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. काश्मीरच्या बांदिपोरा भागात कुलनार इथे चकमकीत एक दहशतवादी ठार मारण्यात आला. तर दोन सैनिक जखमी झालेत. परिसराला वेढा घालून अजूनही शोध मोहीम सुरू आहे. काश्मीरच्या शोपियान आणि पहलगाममध्ये घरांची झडती सुरू आहे. शेकडो संशयित ताब्यात घेण्यात आले आहेत.

पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांची हत्या केल्यानंतर पाच दहशतवादी हे पुन्हा पाकिस्तानात गेले असल्याची माहिती आहे. पाकिस्तानमधून पहलगाममध्ये येण्यासाठी या दहशतवाद्यांना सुमारे आठ तास लागले असावेत, अशी माहिती समोर आली. तर परत जाण्यासाठी देखील जवळपास तेवढाच वेळ लागला असावा. त्या हिशेबानं रात्री दहा ते अकराच्या दरम्यान त्यांनी पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केला असावा अशी शक्यता आहे.

दरम्यान, भारताच्या कठोर पवित्र्यानंतर दहशतवादी संघटना TRFची पाचावर धारण बसल्याचं दिसून आलं. पहलगाम हल्ल्याच्या जबाबदारीवरून टीआरएफचं घूमजाव केले. आधी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या टीआरएफने आता जबाबदारी नाकारली. टीआरएफकडून हल्ल्याची जबाबदारी नाकारणारं पत्रक जारी करण्यात आलं आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!