विश्वास निकम
कोलाड : रोहा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोवे यांनी शैक्षणिक, सांस्कृतिक,क्रीडा, सामाजिक क्षेत्रात विशेष कार्य केल्याबद्दल या शाळेला केंद्रस्तरीय “आदर्श शाळा’ पुरस्कार सन २०२४-२५ या सालासाठी देऊन गौरविण्यात आले आहे.
रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा कोलाड येथे गोवे शाळेचे मुख्यध्यापक जयेश महाडिक व शिक्षिका गांधारे यांना हा पुरस्कार कोलाड केंद्राचे केंद्रप्रमुख नंदकुमार तेलंगे, माजी जिल्हा परिषद स्वीकृत सदस्य आणि आदर्श शिक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष अजय कापसे, कोलाड केंद्र शाळेच्या मुख्यध्यापिका कळमकर मॅडम, पदवीधर शिक्षक घाग सर, शिक्षक राजु दिसले, तसेच कोलाड केंद्रातील सर्व जिल्हा परिषद शाळांचे मुख्यध्यापक व सह शिक्षक यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार गोवे शाळेला नुकताच देण्यात आला.
सन २०२४-२५ यावर्षी राजिप शाळा गोवे येथील विद्यार्थ्यांनी पथनाट्य प्रकारात रोहा तालुक्यात प्रथम क्रमांक तर रोहा तालुक्याचे नेतृत्व करीत रायगड जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकवला होता. तसेच रायगड जिल्हा परिषद गोवे यांनी शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, सामाजिक क्षेत्रात विशेष कार्य केल्याबद्दल केंद्रस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले असुन या यशाबद्दल विविध क्षेत्रातुन या शाळेचे शिक्षक व विद्यार्थी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.