बाजारपेठेत दुचाकींची वर्दळ
बाजारपेठेत लवकरच अतिक्रमण विरोधी मोहीम राबविणार -मुख्याधिकारी जीवन पाटील
विनायक पाटील
पेण : संपूर्ण रायगड जिल्ह्यात नावलौकिक असणाऱ्या पेण शहराच्या बाजारपेठेला आता गल्लीचे रूप प्राप्त झाले आहे. एवढेच नव्हे, तर या बाजारपेठेतील गटारे देखील अदृश्य झाली असून छोट्याशा उरलेल्या मोकळ्या जागेतही दुचाकींची वर्दळ पहायला मिळत असल्याने शहरातील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
भौगोलिकदृष्ट्या पेण हे रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण समजले जाते. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक छोटे मोठे व्यापारी किंवा तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्राहक हे पेणच्या बाजारपेठेतील भाज्या, फळे, मिरच्या किंवा पापड लोणची घेण्यासाठी पेणच्या बाजारपेठेत येत असतात. मात्र या बाजारपेठेला असलेली पसंती पाहता आणि लोकांच्या या बाजारपेठेत वावरण्याचा विचार करता पेणच्या बाजारपेठेत हवी तशी मोकळी जागाच शिल्लक राहिली नाही. पूर्वीचा पेणच्या बाजारपेठेतील जो रस्ता होता त्या रस्त्याचे तर आता अक्षरशः गल्लीत रूपांतर झाले आहे. या बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकाला चालायला सुद्धा रस्ता नसतो अशी परिस्थिती या मार्केटची झाली आहे. आधीच चिंचोळी रस्ता आणि त्यातही अनेक दुचाकीस्वार आपल्या गाड्या या बाजारपेठेत नेत असल्याने बऱ्याच वेळा दुचाकीस्वार आणि ग्राहक यांच्यात वाद होण्याचे प्रकार वाढले आहेत.

पावसाळा जवळ आला असल्याने आता सर्वच स्तरातील प्रशासनाची पावसाळा पुर्वीची तयारी सुरू झाली आहे. पेण पालिकेचा विचार करता आता पालिका देखीलपावसाळ्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ नये याची काळजी घेऊन पावसाळ्यापूर्वी शहरातील गटारे साफ करायला घेणार हे नक्की. पण शहरातील गटारे साफ करताना पेणच्या बाजारपेठेतील गटारे साफ करणार कशी हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. कारण पेणच्या बाजारपेठेतील गटारेच अतिक्रमण झाल्याने अदृश्य झाली आहेत. या गटारांवर फळभाज्यांच्या हातगाड्या, बाजारातील दुकानांच्या पायऱ्या आणि पक्की बांधकामे केली असल्याने ही गटारेच साफ होत नाहीत आणि परिणामी पावसाळ्यात बाजारपेठ पाण्याने भरून पूरसदृश परिस्थिती निर्माण होते.
पेणच्या बाजारपेठेच्या देव आळीकडून आणि पालिका इमारतीकडून अशा दोनही बाजूने वाहनांस प्रवेश निषिद्ध असल्याचे फलक असून देखील या सूचनांकडे कानाडोळा करून अनेक दुचाकीस्वार बाजारपेठेत प्रवेश करत असल्याने अशा दुचाकीस्वारांवर कुठेतरी बंधने घातली गेली पाहिजेत अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटू लागल्या आहेत. पेण पालिकेच्या इमारतीच्या पंचवीस ते तीस मीटर अंतरावर ही बाजारपेठ असून देखील पालिका प्रशासनाच्या ही एवढी मोठी समस्या लक्षात कशी येत नाही, की याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे अशी कुजबुज देखील पेण शहरात ऐकायला मिळत आहे.
पेणच्या बाजारपेठेतील रस्त्याची अवस्था पाहता या बाजारपेठेतील दुकानात एखादी दुर्घटना घडली तर घटनास्थळी फायरब्रिगेडची गाडीच काय, तर रुग्णवाहिका देखील तातडीने पोहोचणे कठीण होऊन बसले आहे. याउलट बाजारातील गर्दीचा विचार करता एखादी घटना घडली तर ग्राहकांनी आपले जीव वाचविण्यासाठी पळापळ केल्यानंतर चेंगराचेंगरी होऊन देखील मोठी दुर्घटना होऊ शकते, त्यामुळे पालिका प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.
पेणच्या बाजारपेठेतील अतिक्रमणे हा फार गंभीर विषय होऊन बसला आहे. याबाबत आमची येत्या आठवडाभरात अतिक्रमण विभाग आणि बांधकाम विभागाच्या माध्यमातून मोहीम राबवली जाणार आहे आणि बाजारपेठ मोकळी करून नागरिकांना मोकळेपणाने खरेदी करण्याची संधी देण्यात येणार आहे.
-जीवन पाटील,
मुख्याधिकारी, पेण नगरपरिषद