घन: श्याम कडू
उरण : उरणमध्ये पुनर्विकासाच्या नावाखाली बिल्डरांनी रस्ते, मोकळ्या जागा गिळायला सुरुवात केली आहे. नव्या इमारती उभ्या करताना बिल्डरांनी खासगी रस्त्यांवरही बिनधास्त अतिक्रमण चालवले असून, तक्रारी करूनही उरण नगरपालिका प्रशासन याकडे कानाडोळा करीत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. बिल्डरांच्या पैशाच्या घोड्यावर प्रशासन धडधडत असल्याची चर्चा शहरभर सुरू आहे.

मुख्य रस्त्यावर डंपर लावून माती साठवली जाते. त्यातील माती रस्त्यावर विखुरली जाऊन जाड थर साचले आहेत. त्यामुळे बाईकस्वारांचे प्राण धोक्यात आले असून, गंभीर अपघात कधीही घडू शकतो. बांधकामाच्या नावाखाली ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण, अवजड वाहनांची वर्दळ यामुळे नागरिक त्रस्त आहेत. सकाळ-संध्याकाळचा निवांत वेळ, विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे तास, आजारी लोकांची विश्रांती सगळंच धुळीला मिळालंय.
बांधकामासाठी सकाळी ९ ते दुपारी १ आणि दुपारी ३ ते संध्याकाळी ७ याच वेळेत काम करण्याचे कडक नियम हवेत. शिवाय, बांधकामस्थळी कापड-पत्र्याचं आवरण सक्तीचं करायला हवं, अशी नागरिक मागणी करत आहेत. तक्रारी करूनही अधिकारी टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे बिल्डर आणि अधिकाऱ्यांमध्ये आर्थिक साटंलोटं असल्याचा संशय बळावत आहे. बांधकाम परवानग्यांसोबत अटी-शर्ती जाहीरपणे लावण्याची आणि तक्रारीसाठी संपर्क सुविधा देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
उरणमध्ये मोठमोठ्या टॉवर्सचं पुनर्विकास धडाक्यात सुरू असताना नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. भविष्यात पाणीटंचाई भीषण स्वरूप धारण करणार, याची कोणालाच चिंता नाही. अधिकारी मात्र खुर्चीत बसून डोळेझाक करताहेत. बिल्डरांच्या मनमानीला आणि प्रशासनाच्या उदासीनतेला चपराक देण्यासाठी उरणकरांनी आता तक्रारी, आंदोलनं आणि गरज पडली तर न्यायालयीन लढाई लढण्याचा मार्ग स्विकारण्याचा निर्धार केला आहे.