महेंद्रशेठ घरत यांच्या दातृत्वाचे गणेश नाईक यांनी केले कौतुक!
विठ्ठल ममताबादे
उरण : महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी फ्लेमिंगोचे अस्तित्व टिकून राहावे म्हणून नवी मुंबईतील पाणथळ जागा आरक्षित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नुकताच घेतला आहे. त्याबद्दल आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी वनमंत्री गणेश नाईक यांचे ‘व्हाईट हाऊस’ येथे जाऊन अभिनंदन केले. यावेळी फ्लेमिंगोंच्या नयनरम्य छायाचित्राची फोटोफ्रेम गणेश नाईक यांना महेंद्रशेठ घरत यांनी भेट म्हणून दिली. यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, “नाईक साहेब, आपण फ्लेमिंगोंना वाचविण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. फ्लेमिंगोंमुळे नवी मुंबईला एक वेगळी ओळख मिळाली आहे. वनमंत्री म्हणून आपला हा निर्णय कायम स्मरणात राहील, त्यामुळे आपले अभिनंदन करणे माझे कर्तव्य आहे. आपण यापुढील काळातही भूमिपुत्रांच्या आणि निसर्गाच्या रक्षणासाठी कटिबद्ध राहाल, अशी आम्हाला आशा आहे. अभिनंदन गणेश नाईक साहेब!”अशा शब्दात महेंद्रशेठ घरत यांनी मंत्री नाईक यांचे आभार मानले.
यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी महेंद्रशेठ घरत आणि त्यांच्या टीमसोबत संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, महेंद्र तू तुझे शेलघर गाव मस्त विकसित केलेस, बंगल्यांचे गाव म्हणून आज प्रसिद्ध होत आहे. तुझे सामाजिक कामही उत्तम सुरू आहे, अनेकांना करत असलेली सढळ हस्ते मदत अभिमानास्पद आहे, हे सर्वांना नाही जमत, पण तू छान करतोस सर्वकाही.”असे भावना व्यक्त केल्या.यावेळी व्यावसायिक अनिल घरत, मनोज फडकर, मुरलीधर ठाकूर, शुभम घरत आदी मान्यवर उपस्थित होते.