सलीम शेख
माणगाव : शहरात मागील काही दिवसांपासून धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. यामध्ये अजून एक भर पडली आहे. माणगांव शहरातील उतेखोलवाडी येथिल सर्वसामान्य वाघमारे कुटुंब. हातावर कमविणे व पानावर मेहनत करून खाणे अश्या परिस्थितीत बाळा वाघमारे यांचे मुलगे विलास वाघमारे, विनायक वाघमारे हे रिक्षा, प्रवासी वाहतूक गाडी असे व्यवसाय करतात. हे वाघमारे कुटुंब राहत असलेल्या उतेखोल वाडी येथील त्यांचा राहत्या घरासमोर उभी असलेली रिक्षा व मॅक्सिमो गाडी ह्या दोन गाड्या २८ एप्रिल च्या रात्री अज्ञात इसमाने पेटवून दिल्या यामध्ये ह्या दोन्ही गाड्यांची अगदी राख झाली आहे.
ह्या घटनेत वाघमारे यांच्या मालकीचे रिक्षा क्रमांक एमएच ०६ झेड ४२५७ व मॅक्सिमो क्रमांक एमएच ०६ बीई ५४६ ह्या दोन्ही गाड्या जळून खाक झाल्या आहेत.रात्री अपरात्री माणगांव मधील महाराणा प्रताप नगर मधील रोहिदास पवार यांच्या स्विफ्ट डिझायर कार खाली देखील एका मनोविकृत व्यक्तीकडून आग लावण्याचा प्रयत्न झाला होता.मात्र प्रसंगावधान राखल्याने हा अपघात टळला होता. मात्र, वाघमारे यांच्या गाड्या जाळणे ही घटना खूप क्लेशदायक आणि दुःखदायक आहे असे मत माणगांव शहरातील नागरिक व्यक्त करत आहेत.
माणगांव शहरात घडणाऱ्या अश्या घटनांना आळा घालण्यासाठी माणगांव पोलिसांनी शहरातील प्रत्येक नगरात रात्रीच्या गस्ती वाढवाव्यात अशी मागणी माणगांवकर नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. उतेखोल वाडी वाघमारे यांच्या गाडी जाळल्याप्रकरणी माणगांव पोलीस ठाणे येथे अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास माणगांव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली माणगांव पोलीस करत आहेत.