वार्ताहर
पेण : पुनम शंभुनाथ गुप्ता या अपंग महिलेने आपली भावजय गीता गुप्ता हिने आपल्या राहत्या घरावर चुकीच्या मृत्युपत्राच्याद्वारे नाव चढविल्याची तक्रार 7 जुलै रोजी केली हेाती. गीता गुप्ता हिला पोलीसांनी अटक करुन मृत्युपत्राबाबत कसुन चौकशी केली असता एकाच मालमत्तेसाठी दोन मृत्युपत्र बनविले असून ते दोन्ही मृत्युपत्र हबीब खोत यांनी तयार केल्याचे समोर आले. त्यातील खरे मृत्युपत्र 21 सप्टेंबर 2020 ला नोंदणीकृत केले. तर दुसरे मृत्युपत्र नोटरीव्दारे 15 फेब्रुवारी 2021 रोजी अंधेरी येथे करण्यात आले. हे मृत्युपत्र खोटे व चुकीचे होते म्हणूनच चुकीचे मृत्युपत्र करण्यासाठी गीता गुप्ता यांच्याविरुध्द पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्यामध्ये सह आरोपी मुद्रांक विक्रेते हबीब खोत यांना काल उशीरा पेण पोलीस ठाण्यात अटक करण्यात आली आहे.
पेण एसटी डेपो समोरील “कस्तुरी प्लाझा” या इमारतीमधील निवासी सदनिका आणि व्यापारी गाळा बनावट मृत्युपत्र बनवून त्या मृत्युपत्रामध्ये बेकायदेरित्या तीन नावे वाढवून, ती सदनिक आणि व्यापारी गाळा हडप करण्यासाठी कट रचल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे, पेण येथील फिर्यादी पुनम शंभुनाथ गुप्ता यांच्या आईच्या मालकी हक्कात असलेल्या निवासी सदनिका आणि व्यापारी गाळा याचे मृत्युपूर्वी मृत्युपत्र बनविले होते. मात्र पूनम यांची आई प्रभावती शंभुनाथ गुप्ता यांच्या मृत्यु पश्चात प्रभावती यांची विभक्त सून आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी गीता सुशील गुप्ता रा. टिटवाळा-कल्याण हिने अंधेरी येथील वकील जनार्दन रावजी मोरे आणि पेण येथील मुद्रांक विक्रेते हबीब खोत यांच्या मदतीने दिनांक १५ फेब्रुवारी २०१९ रोजी बनावट मृत्युपत्र बनवून गीता गुप्ता हिने तिचे व तिच्या दोन मुलींची नावे बनावट मृत्युपत्रात वाढविली. फिर्यादी पूनम या शारीरीक दृष्ट्या दिव्यांग आहेत.
पूनम यांच्या आईच्या मृत्युपश्चात उपरोक्त मिळकतीवर पूनम व भाऊ अनिलकुमार गुप्ता याचे नाव लावण्यासाठी त्यांनी दिनांक ३ जानेवारी २०२३ रोजी रितसर अर्ज नगरपरिषद पेण येथे केला. तेव्हा बनावट मृत्यूपत्राचे प्रकरण उजेडात आल्याचे फिर्यादी पूनम गुप्ता यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी गीता गुप्ता यांना या प्रकरणांमध्ये अटक झाली होती व सध्या जामिनावर बाहेर आहे. पोलिसांनी गीता गुप्ता यांची सखोल चौकशी केल्यावर त्यांनी पेण येथील मुद्रांक विक्रेते हबीब खोत यांनी या कामी मदत केल्याचे उघड केले. गीता गुप्ता यांनी दिलेल्या जबाबावरून पेण पोलिसांनी काल हबीब खोत याला अटक करून बनावट कागदपत्र व फसवणुकीच्या गुन्ह्यात ताब्यात घेऊन कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या या प्रकरणात पुढील तपास पेण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मोहिते हे करत आहेत.
हबीब खोत हे माजी नगरसेवक असून हे मुद्रांक विक्रेते आहेत. तसेच मागच्याच पंधरा दिवसापूर्वी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी खंडणी मागितली म्हणून त्यांना पकडून देणारी व्यक्ती म्हणजेच हबीब खोत. तसेच गेल्या महिन्यापूर्वी सेतूमध्ये जास्त पैसे घेतात, अशी जी ओरड होती. त्याच्यातही हबीब खोत यांचेच नाव पुढे येत होते.