• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उद्या उरणमध्ये ‘मॉक ड्रिल’, नागरिकांनी घाबरू नये, प्रशासनास सहकार्य करावे

ByEditor

May 6, 2025

रायगड : केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्यासाठी “ऑपरेशन अभ्यास” या मॉक ड्रिलचे आयोजन उरण येथे दिनांक ७ मे २०२५ रोजी दुपारी ४ वाजता करण्यात आले आहे.नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, आणि दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहॆ. या मॉक ड्रिलच्या दरम्यान शासनाकडून सूचना मिळाल्यानंतर दुपारी ४ वाजता नागरी संरक्षण दलाचे सायरन वाजवून नागरिकांना धोक्याचा इशारा दिला जाईल.

उरण शहरातील सात ठिकाणी सायरन बसविण्यात आले आहेत. तहसिल कार्यालय, उरण, ONGC कॉलनी,ग्रुप ग्रामपंचायत, चाणजे, GTPS कंपनी, बोकडविरा, बारमर लॉरी, भेंडखळ, ऑल कार्गो कंपनी, कोप्रोली, बल्क गेट कंपनी, मोरा या दरम्यान एन.आय. स्कूल, पंचायत समिती, उरण येथे आग लागल्याच्या बनावावर आधारित मॉक ड्रिल होणार असून, नागरी संरक्षण दल, वैद्यकीय पथक व इतर आपत्कालीन सेवांकडून बचावकार्य, शोध मोहिमा व नागरिकांसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सायंकाळी उरण शहरातील काही भागांमध्ये ५ मिनिटांसाठी ब्लॅकआउट (प्रकाशव्यवस्था बंद) करण्यात येणार आहे. नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, आणि दिलेल्या सूचनांचे पालन करावे. मॉक ड्रिल ही केवळ पूर्वतयारीचा भाग असून कोणतीही खरी आपत्ती उद्भवलेली नाही, हे लक्षात घ्यावे. जिल्ह्यात इतर कोणत्याही ठिकाणी मॉक ड्रिल आयोजित करण्यात आलेली नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!