अनंत नारंगीकर
उरण : वन विभाग व महसूल विभाग यांच्या आशिर्वादाने डोंगर भागात सतत होणारे मुरुम, माती बरोबर दगडाचे उत्खनन, वणवे यामुळे वन्यप्राणी हे सैरभैर झाले आहेत. त्यात चिरनेर गावातील आकाश गोंधळी या शेतकऱ्यांला आपल्या शेत जमिनीजवळ दुर्मीळ झालेल्या रानगव्याचे दर्शन झाले असून सध्या शेतकरी भयभीत स्थितीत वावरताना दिसत आहेत. अन्न पाण्याच्या शोधार्थ वानरांच्या आठ दहा कळपांनी आपला ठिय्या हा रहिवाशांच्या घराच्या छपरावर वळवून घराच्या छपराचे नुकसान करण्यास सुरुवात केल्याने रहिवाशी चिंताग्रस्त झाले आहेत. तरी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रानगवा आणि गावात हैदोस घालणाऱ्या वानरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी, रहिवासी करीत आहेत.

रानगवा किंवा गौर हा एक शाकाहारी भूचर प्राणी आहे. हा प्राणी भारत, नेपाळ, भूतान, बांग्लादेश व आग्नेय आशियाई देशांत आढळतो. केवळ दिसण्यावरून याला इंग्रजीत इंडियन बायसन असे म्हणतात. असे असले तरी बायसन आणि रानगवा हे दोन वेगवेगळ्या कुळातील जीव आहेत. भारतीय पशूंच्या मनाने रानगवा ही एक सगळ्यात उंच जंगली गाय असून मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात प्रथम रानगव्याचे अस्तित्व दिसून आले होते. त्यानंतर पनवेल तालुक्यात रानगवा आढळून आला होता. मात्र सततच्या डोंगर उत्खननामुळे वन्यप्राण्यांची आश्रयस्थाने नष्ट होत असल्याने वन्यप्राण्यांनी आपला मोर्चा हा रहिवाशांच्या वस्तीकडे वळविला असल्याची बाब समोर येत आहे. त्यात चिरनेर, केळवणे, कळंबुसरे, दिघाटी गाव परिसरात या अगोदर बिबट्याचे दर्शन घडले होते. त्यानंतर वानरांनी रहिवाशांच्या घरावर हैदोस घातला असताना चिरनेर गावातील आकाश गोंधळी या शेतकऱ्याला दुर्मीळ रानगव्याचे दर्शन घडले.

हजार किलो वजनाच्या जंगली रानगव्याचे दर्शन घडल्याने या परिसरातील शेतकरी भीतीच्या छायेखाली वावरताना दिसून येत आहेत. तरी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर दुर्मीळ अशा रानगव्याचा बंदोबस्त करुन रहिवाशांच्या घरावरील कौलाचे, पत्र्यांचे नुकसान करणाऱ्या वानरांचाही बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी, रहिवासी व्यक्त करत आहेत.

