• Fri. Mar 13th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

फी भरली तरच निकाल…कोकण उन्नती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या निर्णयाने पालक वर्गात नाराजी

ByEditor

May 6, 2025

स्कूल कमिटी मेंबर योगेश गंद्रे यांची अरेरावी

अमुलकुमार जैन
अलिबाग :
रायगड जिल्ह्यासह राज्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे पेव फुटले असून पालक वर्गाकडून सुद्धा आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये दाखल करण्याचा कल मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. मात्र या शाळांकडून शाळेचे शुल्क न भरल्याने त्यांचे निकाल न देण्याचे प्रकारही अनेकवेळा घडत असतात. असाच एक प्रकार श्रीवर्धन शहरात असणाऱ्या कोकण उन्नती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये घडला आहे. मात्र याबाबत विचारणा केली असता स्कूल कमिटी मेंबर योगेश गंद्रे यांची अरेरावीची उत्तरे दिल्याची चर्चा श्रीवर्धन शहरासह तालुक्यात सुरू आहे.

आपली मुले ही इंग्लिश मिडीयममध्ये शिक्षण घेत आहेत हे इतराना सांगताना भूषणावह वाटावे म्हणून आपल्या पाल्यांना इंग्लिश माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेतात. मात्र याचा फायदा इंग्रजी माध्यमच्या संस्था घेत आहे. तसेच त्यांच्याकडून विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची लुबाडणूक करीत आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळा या कायमस्वरूपी विना अनुदानित म्हणजेच स्वतःच्या फायनान्सवर चालत आहेत. यावर शासनाने काही अटी शर्ती घालून दिल्या आहेत. याचे पालन होताना दिसून येत नाही. इंग्रजी माध्यमांच्या शाळांना शासनाने आखून दिलेल्या फी बाबत सुद्धा शासनाचे नियंत्रण दिसुन येत नाही. आता मे महिना चालू झाला असून शाळांचा निकाल सुद्धा लागला आहे. पुनःश्च जून महिन्यात शाळा चालू होणार आहेत.

श्रीवर्धन शहरात असलेल्या कोकण उन्नती इंग्लिश मीडियम स्कूल यांच्याकडून तर पाल्यांचा निकाल फी भरल्या शिवाय देणार नसल्याची अट घालण्यात आली आहे. याबाबत पालकांकडून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. शाळेकडून दरवर्षी शाळा सुरू होताना ॲडमिशन फी, ॲक्टिव्हिटी फी, टर्म फी, ट्युशन फी अशा प्रकारच्या फी वसूल केल्या जात असतात. यामध्ये हजारो रुपयांची फी आकारली जात आहे. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा विचार करता प्रत्येक विद्यार्थ्याला पडलेली फी एकत्र बेरीज केल्यास हा आकडा कितीपर्यंत जात असणार. हे सर्व शासनाने ठरवल्याप्रमाणे आहे का? याची शहानिशा होणे गरजेचे असून शाळेकडून चालू वर्षात फी न भरलेल्या विद्यार्थ्यांचा राखून ठेवण्यात आलेला निकाल का बर देण्यात आलेला नाही? याची सुद्धा चौकशी होणे गरजेचे आहे.

ज्यावेळी पालकांनी त्यांच्या मुलांना शाळेत प्रवेश घेतला होता तेव्हा त्यांनी फी चा विचार केला नव्हता का? शाळेची फी भरल्याशिवाय आम्ही निकाल देणार नाही, कुठे जायचे तेथे जा. तसेच शाळेला सेल्फ फायनान्सची परवानगी मिळाली आहे. विद्यार्थ्यांकडून मासिक वर्गणी जमा केली जाते. त्यातूनच शिक्षकांचा पगार दिला जातो. काही पालक फी वेळेत देत नसल्याने असे कठोर निर्णय घ्यावे लागतात.
-योगेश गंद्रे
शाळा कमिटी मेंबर
कोकण उन्नती इंग्लिश मिडीयम स्कूल. श्रीवर्धन -रायगड.

संबंधित शाळेच्या प्रशासनास सूचना करून ज्यांचे निकाल फी वाचून अडवले असतील त्यांचे निकाल देण्यास सांगतो.
-महारुद्र नाळे
शिक्षणाधिकारी, राजिप

फी भरली नाही म्हणून निकाल अडविणे ही बाब चुकीची आहे.सदर संस्थेच्या प्रशासनास सूचना देतो की सदर मुलाची फी बाकी असेल त्यांना त्याचे निकाल देण्यात यावे. तसेच त्याच्याकडे असणारी फी ही टप्प्या टप्प्याने वसून करण्यात यावी.
श्री. चव्हाण
गट शिक्षण अधिकारी, श्रीवर्धन.

माझ्या पालकाची फी भरणे बाकी आहे. मात्र माझी आर्थिक अडचण असल्याने मी फी नंतर भरणार आहे अशी विनंती केली असताना सुद्धा संस्थेने माझी विनंती नाकारत त्यांनी निकाल देण्यास नकार दिला आहे. यापुढे मी निकाल घेण्यास शाळेत जाणार नाही.
भावेश मांजरेकर
पालक.

या संदर्भात शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, माजी आमदार मुश्ताक अंतुले यांच्याशी मोबाईल फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी फोन उचलला नाही.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!