पाली : सुधागड तालुक्यातील करचुंडे गावातील अंगणवाडी सेविका गीता दत्तात्रेय भालेकर या ४० वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या. ४० वर्षाच्या प्रदीर्घ सेवेत असताना आपल्या गावातील बऱ्याच लहान मुलांना नुसते प्राथमिक शिक्षण दिले नाही तर, त्यांनी बालकांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
गीता भालेकर यांनी आपल्या सेवेतून समाजातील अनेक गरजू बालकांना शिक्षण व पोषणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मदत केली आहे. त्यांच्या सहृदयतेमुळे आणि कार्यक्षमतेमुळे त्यांनी पालक व विद्यार्थ्यांमध्ये विश्वास आणि प्रेम निर्माण केले. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला, जिथे सहकारी, पालक आणि विद्यार्थी यांनी त्यांचे आभार मानले.

जांभुळपाडा येथे त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन त्यांच्या कुटुंबियांमार्फत करण्यात आले होते. यावेळी भालेकर बाईंना शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवरांसह त्यांचे सहकारी, त्यांचे विद्यार्थी व नातेवाईक मोठ्या संख्यने उपस्थित होते. यावेळी त्यांच्या विद्यार्थ्यांनी मनोगतातून बाईंच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी केलेल्या संस्कारांबद्दल कृतघ्नता व्यक्त करत त्यांच्या निरोगी आयुष्याकरिता प्रार्थना केली. त्यांच्या सहकारी सेविकांनी भालेकर बाई आपल्यापेक्षा कसे सरस काम करायच्या याची काही उदाहरणे देत त्यांच्या प्रदीर्घ सेवेचा गौरव केला. यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत भालेकर बाईंच्या कार्याची प्रशंसा करत त्यांना पुढील वाटचालीकरता शुभच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रावणी भालेकर हिने केले.

लग्नाचा ४५वा वाढदिवसही साजरा
सेवानिवृत्तीच्या आनंदाबरोबरच दत्तात्रय भालेकर आणि गीता भालेकर यांच्या विवाहाचा ४५वा वाढदिवसही ४ मे रोजी साजरा करण्यात आला. या दुहेरी आनंदाच्या प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांनी, नातेवाईकांनी आणि मित्रपरिवाराने त्यांना शुभेच्छा दिल्या. गीता भालेकर आणि त्यांचे पती दत्तात्रय भालेकर यांनी आपल्या विवाहाच्या प्रवासात एकमेकांसोबतच्या सहकार्याने आणि समजूतदारपणाने हा टप्पा गाठला आहे. त्यांच्या जीवनातील या महत्त्वाच्या क्षणाचे औचित्य साधून, एक छोटेखानी समारंभ आयोजित करण्यात आला. ४५व्या विवाहवर्धापन दिनाच्या आनंदात त्यांच्या कुटुंबीयांनी पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा आयोजित केला होता. या खास प्रसंगाला नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित होते. या अनोख्या पुनरावृत्त विवाह सोहळ्याचा आनंद सर्व उपस्थितांनी घेतला आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.


