मिलिंद माने
महाड : भारत-पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पेट्रोल डिझेलसह रॉकेल इंधनाची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने इंधनपुरवठा करणाऱ्या पुरवठादारांनी त्यांच्याकडे पुरेसा इंधन साठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना रायगड जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे यांनी एका परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.
राज्यात मागील चार दिवसापासून भारत-पाक दरम्यान सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यात इंधनाचा तुटवडा होण्याची शक्यता निर्माण झाली असताना आज रायगड जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे यांनी परिपत्रकाद्वारे भारत पाकिस्तान या दोन देशांदरम्यान सद्यस्थितीत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील अन्नधान्याची, केरोसीन, पेट्रोल, डिझेल यासारख्या इंधनाची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे असे स्पष्ट केले आहे. तरी आपल्या अधिनस्त असलेले पुरवठादारांकडे गोदामामध्ये अन्नधान्याचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवावा तसेच रेशन दुकानदार, इंधन पुरवठादार यांनी त्यांच्याकडे पुरेशा अन्नधान्य साठा व इंधन साठा उपलब्ध ठेवण्याबाबत स्पष्टपणे सूचना दिल्या आहेत.
भारत पाकिस्तानच्या युद्धजन्य परिस्थितीवर राज्यात वाहनांना लागणाऱ्या डिझेल व पेट्रोल या इंधनाचा तुटवडा भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे, यामुळे जिल्ह्यासह तालुक्यातील तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील इंधन पुरवठा करणाऱ्या पेट्रोल व डिझेल पंपधारकांकडे इंधनाचा पुरेसा साठा भरण्यासाठी आता वाहन चालकांची रीघ लागणार आहे. यामुळे पेट्रोल पंप चालक व वाहन चालकांमध्ये बाचाबाची होऊन वाद निर्माण होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.
देशातील इंधनसाठा सुरळीत
भारत-पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आता भारतात इंधनाची टंचाई होणार या भीतीने अनेकजण पेट्रोलपंपांच्या बाहेर रांगा लावतानाच्या सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाल्यानंतर इंडियन ऑईल कंपनीनं इंधनाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. देशभरात इंधनाचा पुरेसा साठा केला आहे. त्यामुळे पेट्रोलटंचाईची कुठलीही शक्यता नाही, त्यामुळे भीतीपोटी पेट्रोल पंपांवर रांगा लावू नका असं आवाहन इंडियन ऑईलनं केलं आहे.