• Tue. May 13th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

धक्कादायक निकाल! तांबडी अत्याचार व खून प्रकरणातील आरोपींची निर्दोष सुटका

ByEditor

May 10, 2025

सर्व समाजातून संतापाची लाट, घटना घडली नाही का? संतप्त नागरिकांचा सवाल

मंगळवारी पोलीस ठाण्यावर मोर्चा; पत्रकार परिषदेत माहिती

शशिकांत मोरे
धाटाव :
सबंध राज्याला हादरवून सोडणारी, सरकारतर्फे चालवण्यात आलेल्या फास्ट ट्रॅकवरील तांबडी येथील पीडीत अत्याचार व खून प्रकरणातील सर्वच आरोपींची माणगांव सत्र न्यायालयाने गुरुवारी निर्दोष सुटका केली. सर्व आरोपींची निर्दोष सुटका होणे, हा न्यायालयीन निकाल फारच धक्कादायक आहे. त्यामुळे पीडितेची बाजू मांडण्यात सरकारी वकील उज्वल निकम कमी पडले. तपासात काय त्रुटी होत्या, तपास पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका हेतूत: संशयास्पद आहे. मग घटनाच घडली नाही का? असा सवाल उपस्थित होत तालुक्यातील सर्व समाजातून संतापाची लाट उसळल्याचे शनिवारी समोर आले.

संग्रहित

गुरुवारच्या निकालानंतर सबंध तालुका आक्रोशाने अक्षरशः ढवळून निघाला. आरोपींची निर्दोष सुटका होण्याचा निकाल दुर्दैवी आहे. तपास यंत्रणेचा आम्ही निषेध करतो, असे म्हणत शुक्रवारी सायंकाळी तांबडी येथे समाज बांधवांची बैठक झाली. त्यानंतर शनिवारी सकाळी रोहा येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित मराठा समाज यांसह सर्व बहुजन समाजाने मंगळवारी पोलीस ठाण्यावर मोर्चाचे संकेत देऊन एकच खळबळ उडवून दिली. दरम्यान, तांबडी अत्याचार व हत्या प्रकरणी लागलेला निकाल हा अत्यंत अन्यायकारक आणि दुर्दैवी आहे. कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, उच्च न्यायालयात जाण्याची तयारी आहे अशी प्रतिक्रिया महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली तर निकालाबाबत ॲड. उज्वल निकम यांच्याशी चर्चा केली. तपासातील त्रुटी लक्षात घेत सखोल चौकशीचे संबंधीतांना निर्देश देण्यात आलेत, पिढीतेच्या न्यायासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न करू अशी ग्वाही खा. सुनील तटकरेंनी दिल्याने पुढे काय होते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जुलै २०२० रोजी तांबडीतील पीडीतेवर अत्याचार व नंतर खून केल्याची खळबळजनक घटना घडली होती. घटनेने सबंध जिल्हा हादरून गेला. पीडितेच्या न्यायासाठी सर्व समाज रस्त्यावर उतरला होता. राज्यातील अनेक नेत्यांनी आरोपींना तत्काळ अटक व प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्याची मागणी केली. दिवंगत नेते विनायक मेटे यांनी हा गंभीर विषय लावून धरला. आ. प्रवीण दरेकर, चित्रा वाघ, दिवंगत माणिकराव जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली होती. तत्कालीन आघाडी सरकारच्या काळातील ना. आदिती तटकरे, खा. सुनील तटकरेंनी पीडीतेला न्याय देण्यासाठी कठोर पावले उचलली. सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची निवड करणे, खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्यासाठी तटकरे यांनी पाठबळ दिले. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तांबडी घटनास्थळी भेट देत खटला सरकारतर्फे फास्ट ट्रॅकवर चालवण्याचे जाहीर केले. तरीही खटला तब्बल ५ वर्षाहून अधिक काळ चालला. अखेरच्या क्षणापर्यंत संबंधीत आरोपींना कठोर शिक्षा होईल असे सांगणारे ॲड. उज्वल निकम यांना सपशेल अपयश आले. सर्वच आरोपी सत्र न्यायालयात दोषमुक्त झाले.

ही घटना समजताच संवेदनशील समाजाने आक्रोश व्यक्त केला. हा निकाल आम्हाला मान्य नाही म्हणत समाजाने शनिवारी पत्रकार परिषद घेऊन निषेध व्यक्त केला. यावेळी समाजाचे अध्यक्ष आप्पा देशमुख, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष समीर शेडगे, भाजपचे अध्यक्ष अमित घाग, विभागीय नेते उदय शेलार, रमेश वायकर, महेश सरदार, अमित मोहिते, ॲड. दीपक सरफळे, शाम लाड, हरेश नायनेकर, राजेश म्हांदलेकर यांसह विविध समाजातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आम्हाला हा निकाल मान्य नाही. घटना घडली नाही असाच हा निकाल आहे. हे आरोपी नाहीत मग आरोपी कोण, समोर का आणले नाहीत हे तपास यंत्रणेचं अपयश आहे. ॲड. उज्वल निकम यांनीही समाजाला, पीडित कुटुंबाला गाफील ठेवले, निकालाचा दिवसही आम्हाला कळविला नाही असा संताप रमेश वायकर यांनी व्यक्त केला.

ना. आदिती तटकरे, खा. सुनील तटकरे यांनी हा निकाल दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. पीडीतेला न्याय देण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न करू असे सांगितल्याची माहिती देत प्रसंगी आक्रमक पवित्रा घेऊ अशी भूमिका समीर शेडगे यांनी व्यक्त केली. मंगळवारी सर्व समाजाच्यावतीने मारुती चौक ते पोलीस ठाणे असा मोर्चा काढण्याचे आयोजन होत आहे‌, आमच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही अशी माहिती वजा ईशारा अध्यक्ष आप्पा देशमुख यांनी दिला. उदय शेलार, अमित घाग, महेश सरदार व अनेकांनी मत व्यक्त केले. दरम्यान, आरोपींच्या निर्दोष सुटकेनंतर प्रशासनच्या नाकर्तेपणा विरोधात मंगळवारी सर्व समाजाच्यावतीने मोर्चा काढण्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तर पीडीतेच्या न्यायासाठी मोर्चा व मागण्यांच्या पार्श्वभूमीवर एकंदर प्रकरणाला काय कलाटणी मिळते, नेमके काय घडते, संबंध रोहेकरांची काय आक्रमकता राहते? याकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!