मनाल राऊत ९०. ८० टक्के गुण मिळवून शाळेमध्ये सर्वप्रथम
सलीम शेख
माणगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी शालांत परीक्षेचा निकाल मंगळवार दि. १३ मे २०२५ रोजी ऑनलाईन जाहीर झाला.या परीक्षेत माणगाव तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या मोर्बा मॉडर्न इंग्लिश स्कूलने आपली उज्वल यशाची परंपरा कायम ठेवीत या शाळेचा दहावी परीक्षेचा एकूण निकाल ९८ टक्के इतका लागला असून कु.मनाल मजीद राऊत या विद्यार्थिनीने ९०. ८० टक्के इतके गुण संपादन करून शाळेमध्ये सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला आहे.
या शाळेमधून कु. मोहम्मद जमील अहमद राऊत व कु. मुनीब शमसूलहुदा फिरफिरे या विद्यार्थ्यांनी ९०.२० टक्के इतके गुण संपादन करून अनुक्रमे द्वितीय क्रमांक तर कु. शिफा एजाज धनसे या विद्यार्थिनीने ९० टक्के इतके गुण संपादन करून तृतीय क्रमांक पटकावत शाळेच्या यशामध्ये मानाचा तुरा रोवला आहे. या शाळेमधून यावर्षी दहावी परीक्षेसाठी एकूण ४५ विद्यार्थी बसले होते त्यापैकी ४४ विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये ३४ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य संपादन केले असून प्रथम श्रेणीत ८ विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत २ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
या शाळेचा दरवर्षी निकाल नेत्रदीपक लागत असल्याने पालकवर्गांमध्ये तसेच विद्यार्थ्यांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण असून संस्था पदाधिकारी यांनी शिक्षकांचे खास अभिनंदन करून यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. सैफुद्दीन धनसे, सेक्रेटरी शौकत रोहेकर, खजिनदार इकबाल धनसे, सदस्य नजीर धनसे,इकबाल हर्णेकर,मुख्याध्यापक मोहन साळी.सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी विशेष अभिनंदन करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
