देखभाल व दुरुस्तीसाठी वीज खंडित, श्रीवर्धनमध्ये संताप
उन्हामुळे बाहेर जाता येईना; वीज नसल्याने घरात ही बसवेना
गणेश प्रभाळे
दिघी : एकीकडे सूर्य आग ओखत आहे. वातावरणात प्रचंड उकाडा सुरू झाला आहे. त्यात आणखी भर म्हणून देखभाल व दुरुस्तीसाठी श्रीवर्धन वाळवटी सेक्षांची मंगळवारी दिवसभर विज खंडीत करण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत असून, आता घराबाहेर ही पडवेना आणि घरातही बसवेना अशी अवस्था सर्वसामान्यांची झाली आहे.
वातावरणातील तापमानात मोठया प्रमाणात वाढ झाल्याने श्रीवर्धन तालुका चांगलाच तापला आहे. त्यामध्ये महावितरणकडून देखभाल व दुरूस्तीसाठी महिन्यातून तीन चार वेळा वीज पुरवठा बंद करण्यात येतो. त्यामुळे सर्वसामान्यांना व विशेषतः ग्रामीण भागातील जनतेचे मोठ्या प्रमाणावर हाल सुरू आहेत. कारण ग्रामीण भागात मोल मजुरीने कमी उत्पन्नात आपल उदरनिर्वाह करणारे कुटुंब इन्व्हर्टर सारख्या सुविधा देखील उपलब्ध करू शकत नाही. त्यामुळे एसी, कुलर या गोष्टी खरेदी करणे खूपच लांब राहिल्या.
सुरक्षिततेच्या दृष्टीने वीज बंद केली जाते. मात्र, बहुतांश वेळा यंत्रणेतील बिघाडामुळे वीज जाण्याचे प्रकार होत असतात. वीजउपकेंद्र, रोहित्रांमध्ये बिघाडही होतात. दुरुस्ती व देखभालीच्या कारणास्तव विशिष्ट दिवशी कामे केली जात नाही, अधिकारी व कर्मचार्यांच्या मनमानी प्रमाणे वीजपुरवठा बंद केला जातो. ऐन गरजेच्या वेळी वीज जाण्याचे प्रकार का होतात, असा प्रश्न उपस्थित केला जातो. त्याला ‘महावितरण’ची यंत्रणा काही प्रमाणात जबाबदार असल्याचा आरोप होतो आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील महावितरण कंपनीकडून दुरुस्तीच्या कामांसाठी होणारा खंडीत वीज पुरवठा या वाढत्या तापमानात कमी करण्यात यावा. येथील पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीकोनातून त्याचा परिणाम जाणवत आहे. त्यामुळे कमी वेळात दुरूस्ती होऊन जनतेला विद्युत सेवा सुरळीत मिळावी अशी मागणी होत आहे.
दुरूस्तीसाठी वेळापत्रक नाही
महावितरणकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून वीज दुरुस्तीच्या सूचना समोर येतात. पण अशा पूर्वसूचना तालुक्यातील सर्वापर्यंत पोहचत नाही. गाव – वाड्यावरील जनतेला विद्युत सेवा किती तासाने सुरळीत होईल याची माहिती मिळत नाही. दिवसभर दुरुस्तीसाठी खंडीत केलेली वीज सायंकाळी 5 वाजता येणार अशी माहिती दिली जाते. मात्र, आणखी दोन ते तीन तास उशिराच सुरू करण्याचे काम महावितरण कंपनीकडून नेहमी होत आहे.
मंगळवारी दुरूस्तीसाठी विज पुरवठा बंद करण्यात आला. लवकरच सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहोत.
-दिपक घुगे,
महावितरण अधिकारी, वाळवटी सेक्शन.
