• Wed. Jul 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण नगरपरिषदेच्या कंत्राटी कामगारांचे उपोषण तूर्तास स्थगित

ByEditor

May 14, 2025

मुख्याधिकारी समीर जाधव व कंत्राटदार यांच्याशी समन्वय साधून मार्ग निघाला

विठ्ठल ममताबादे
उरण :
दि. १३/५/२०२५पासून सुरू केलेले आमरण उपोषण उरण नगर परिषद प्रशासनाने प्रलंबित निविदा प्रक्रिये संदर्भात कराराची पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीचे पत्र नवीन ठेकेदार कंपनीला दिल्यामुळे पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांच्या सुचनेनुसार तात्पुरते आमरण उपोषण स्थगित करण्यात आले आहे.

उरण नगरपरिषदेच्या घनकचरा विभागातील कंत्राटी कामगारांना ठेकेदार मे. भाग्यदिप वेस्ट मॅनेजमेंट यांनी दि. ३/५/२०२५ पासून बेकायदेशीरपणे कामावरून कमी केले होते. त्याविरुद्ध दि. १३/५/२०२५ पासून कंत्राटी दलीत, आदिवासी, गोरगरीब कामगारांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते. आपण व सहायक पोलीस आयुक्त यांचे सूचनेनुसार मुख्याधिकारी, उरण नगरपरिषद यांच्या बरोबर सकारात्मक चर्चा झाली. त्यावेळी कोवीड कालावधीत जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या ह्या कंत्राटी सफाई कामगारांना न्याय देण्याच्या मागणीवर उरण नगरपरिषद प्रशासनाने नवीन ठेकेदार कंपनीला तीन महिन्यापासून प्रलंबीत असलेले पत्र पुढील करारपुर्ती करीता दिले असल्याने चार दिवसांत प्रश्न निकालात निघतील असे सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. तसेच देशातील युद्धजन्य परिस्थिती विचारात घेऊन सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल नेहूल आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेन्द्र मिसाळ यांनी सदरहू आंदोलन चार दिवस स्थगीत करण्याच्या सुचना म्युनिसिपल एम्प्लॉइज युनियनचे पदाधिकारी अध्यक्ष ॲड. सुरेश ठाकूर, कार्याध्यक्ष संतोष पवार, सरचिटणीस अनिल जाधव यांनी पोलीस प्रशासनाने दिलेल्या सुचनेचा आदर ठेवून सध्या सुरू असलेले आमरण उपोषण दि. १९/५/२०२५ रोजीपर्यंत तात्पुरते स्थगित केले आहे. याच प्रश्नाबरोबर ईतर प्रश्नांसंदर्भात उरण नगरपरिषद कार्यालयावर काढण्यात येणारा दि. १६/५/२०२५ रोजीचा मोर्चा देखील तूर्त स्थगित करण्यात आला आहे.

म्युनिसिपल एम्प्लॉइज युनियनच्या पदाधिकारी यांनी मुख्याधिकारी समिर जाधव यांच्याकडून अपेक्षा आहे की, दि. १९ मे २०२५ पर्यंत कंत्राटी दलीत, आदिवासी गोरगरीब सफाई कामगारांवरचा अन्याय दूर होईल या निमित्ताने निर्माण झालेले प्रश्न निकाली निघतील. परंतू असे न झाल्यास हे स्थगित केलेले आमरण उपोषण पुन्हा दि. २० मे २०२५ रोजी पासून उरण नगरपरिषद प्रवेशद्वारासमोर सुरू होणार, त्याचप्रमाणे हा विषय व ईतर मागण्यासाठी दि. १६ मे २०२५ रोजी ज्या कारणाने मोर्चा निघणार होता तो स्थगित कलेला मोर्चा देखील दि. २२ मे २०२५ रोजी उरण नगरपरिषद कार्यालयावर काढण्यात येणार आहे.

अतीशय अल्प वेतनावर काम करणाऱ्या या दलीत, आदिवासी गोरगरीब कंत्राटी सफाई कामगारांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकाळपासून आदिवासी गोरगरीब बांधवांसाठी झटणारे प्रा. तथा ॲड. राजेंद्र मढवी, उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, म्युनिसिपल एम्प्लॉइज युनियनच्या उरण युनिटचे कार्याध्यक्ष मधूकर भोईर, सामाजिक कार्यकर्त्या सीमाताई घरत, सामाजिक कार्यकर्त्या वंदना पवार, माजी नगराध्यक्ष परमानंद करंगुटकर, पत्रकार जगदिश तांडेल, पत्रकार मधूकर ठाकूर, पत्रकार प्रविण पुरो, सामाजिक कार्यकर्ते मनिष कातकरी, पत्रकार शेखर पाटील, सामाजिक कार्यकर्ते सचिन वर्तक यांनी भेट दिली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!