कपडे काढून नाचू नका असे सांगितल्याचा राग आल्याने लोखंडी कालत्याने दोघांना मारहाण; एकाचा मृत्यू
एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात तर एक फरार
अमुलकुमार जैन
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील बीड गावाच्या इस्टूल वाडीमध्ये काल रात्री लग्नसमारंभात डीजेच्या तालावर कपडे काढून बेधुंद नाचणाऱ्यांना अडविले भांडण झाल्याने या भांडणात एकाने जीव गमावला तर दुसरा जबर जखमी झाला. खोपोली पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दुसरा अद्याप फरार असून त्याचा शोध सुरु आहे.
खालापूर तालुक्यातील बीड जांबरुंग आदिवासीवाडी येथे विकास पवार यांच्या हळदी कार्यक्रमात महिला नाचत असल्याने कपडे काढून नाचू नका असे सांगितले असता बाळू ऊर्फ बिटया मधूकर मुकणे (रा, इस्टूल आदिवासीवाडी, ता. खालापूर), प्रकाश रमेश पवार (रा. बीड जांबरुंग, खालापूर) यांना राग आल्याने त्यांनी लोखंडी कालथ्याने मारहाण केल्याने यामध्ये अनंता गोपाळ वाघमारे (वय 40, रा. बीड जांबरुग आदिवासीवाडी, ता. खालापूर जि. रायगड) याचा मृत्यू झाला तर विलास गोपाळ वाघमारे (वय 38. रा.बीड जांबरुग आदिवासीवाडी, ता. खालापूर जि रायगड, सद्या रा. दबडे बीड, ता. कर्जत, जि. रायगड) जखमी झाले असून याबाबतची फिर्याद खोपोली पोलीस ठाण्यात जखमी विलास गोपाळ वाघमारे यांनी दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार १३ मेच्या रात्री एक वाजण्याच्या सुमारास बीड गावाच्या आदिवासी वाडीत लग्नसमारंभानिमित्त हळदीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात बाळू मुकणे आणि प्रकाश पवार मंदधुंद होऊन नाचत होते. मांडवामध्ये शर्ट काढून ते नाचू लागले म्हणून त्या आदिवासी वाडीतील विलास वाघमारे यांनी त्यांना अडवले व येथे मुली, महिला नाचत आहेत त्यामुळे तुम्ही कपडे काढून नाचू नका असे सांगितले. या गोष्टीचा मनात राग धरून बाळू मुकणे व प्रकाश पवार यांनी विलास वाघमारे याला मारहाण करायला सुरुवात केली. तेव्हा विलास वाघमारे याचा भाऊ अनंता वाघमारे हा भांडण मिटवायला मध्ये पडला. प्रकाश पवार याने बाजूला पडलेला भात शिजवायचा भला मोठा कालता (उलाथने) उचलला व विलास वाघमारे याच्या डोक्यात व हातावार माराला. विलासच्या डोक्यात मोठी जखम झाली व तो रक्तबंबाळ होऊन बाजूला पडला व भांडणे मिटवायला आलेला विलासचा मोठ्या भाऊ अनंताच्या छातीवर कालत्याने जोरदार उपटी टाकल्या. दरम्यान दोन्ही भावांना रिक्षाने खोपोली येथे उपचाराकरिता आणण्यात आले. मात्र मोठा भाऊ अनंता वाघमारे हा रुग्णालयात आणत असतानाच रस्त्यातच मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.विलास वाघमारे याच्या डोक्यात सहा टाके पडले.
सदर घटना खोपोली पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा आरोपी तेथून पसार झाले होते. मात्र त्या दोघांपैकी बाबू मधुकर मुकणे यास केळवली रेल्वे स्थानकात १३ मे रोजी रात्री ८ वाजून ५२ मिनिटांनी खोपोली पोलिसांनी ताब्यात घेतले. दुसरा आरोपी प्रकाश रमेश पवार हा काही मिळून आला नाही. त्याचा शोध खोपोली पोलीस घेत आहेत. सदर माहिती पोलिस ठाण्यात समजाताच पोलिस निरिक्षक शीतल राऊत, पो. ह. सागर शेवते रूग्णालयात पोहचले. त्यानंतर सकाळी उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी घटनास्थळी भेट देवून पाहाणी केली.
याबाबत खोपोली पोलिस ठाण्यात गु. र. नं. 0131/2025, भारतीय न्याय संहिता कायदा 2023 103(1),109(1),115(2),352,351(2),3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास खालापूर उप विभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, पोलिस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे हे करीत आहेत.
