• Wed. Jun 18th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

धरण उशाला अन् कोरड घशाला! रानसई आदिवासी बांधवांना पाणी टंचाईच्या झळा

ByEditor

May 16, 2025

अनंत नारंगीकर
उरण :
तालुक्यातील रानसई या गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. गावालगतच उरण शहर, गावांना पाणीपुरवठा करणारा रानसई येथील डोंगर भागात धरण आहे. त्यामुळे धरण उशाला अन् कोरड घशाला अशी गत रानसई ग्रामस्थांची झाली आहे. काही वर्षांपासून पेयजल तसेच जलजीवन योजनेचे काम रखडल्याने टंचाईत भर पडली आहे. ग्रामस्थांना तलावालगत असलेल्या सार्वजनिक विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे. तसेच हातपंपावरुन पाणी भरावे लागत आहे. गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली असतानाही रानसई ग्रामपंचायत, संबंधित प्रशासन याकडे लक्ष देत नाही, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे.

उरण तालुक्यातील रानसई ग्रामपंचायत हद्दीतमध्ये खैरकाठी, भुऱ्याची वाडी, मार्गाची वाडी, बंगल्याची वाडी, सागाची वाडी, खोंड्याची वाडी या सहा वाड्यांमध्ये आदिवासी समाजाची १४०० लोकसंख्या आहे. या वाड्यांपैकी दोन वाड्यांमधील महिला वर्ग एकाच हापशीवरून पाणी भरत आहेत. हापशी वर एक एक हंडा भरण्यासाठी रात्र रात्र जागून काढावी लागत आहे. मजुरी करून पोट भरणाऱ्या आदिवासी महिलांना मजुरी सोडून पाणी भरण्यासाठी घरीच थांबावे लागत आहे. भेडसावणारी पाण्याची समस्या दूर करण्यासाठी शासनाने अनेक वेळा योजना मंजूर केल्या, परंतु शासनाच्या भ्रष्ट कारभारामुळे सदरच्या योजनांची कामे ही रेंगाळत पडली आहेत. त्यामुळे रानसई आदिवासी बांधवांची अवस्था ही धरण उशाला आणि कोरड घशाला अशीच झाली आहे.

पावसाळ्यामध्ये वापरण्यासाठी पाणी मिळते परंतु, उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी झगडावे लागते. एक हपशी आहे, त्या हपशीवर दोन वाड्या पाणी भरतात. एकेएक हंडा भरायला पंधरा मिनिटे लागतात. पाण्यासाठी अनेक महिलांना मजुरीला मुकावे लागते. आत्ता दोन दिवसापूर्वी ट्रॅंकर सुरु झाले, मात्र ते ही पाणी आम्हाला पुरत नाही. तरी शासनाने ठोस उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा –
-सोमी मंगल्या दोरे
खैरकाठी वाडीतील महिला

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!