अनंत नारंगीकर
उरण : उरण व अलिबाग तालुक्यातील करंजा बंदर ते रेवस बंदर या दोन महत्त्वाच्या बंदरांना जोडणारा रेवस – रेड्डी हा शासनाचा महत्वाचा सागरी महामार्ग कोकण किनारपट्टीतून जात आहे. मात्र करंजा नवापाडा येथील बाधित ग्रामस्थांना विश्वासात घेऊन सदरच्या सागरी महामार्गाचे काम हे ठेका घेणारे अफकाँन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी करत नसल्याने त्याचा नाहक त्रास हा येथील कोळी बांधव व ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्याचा जाब विचारण्यासाठी करंजा नवापाडा ग्रामस्थांनी शनिवारी (दि. १७) करंजा बंदरात सुरु असलेल्या रेवस – रेड्डी या सागरी महामार्गाच्या कामावर धडक दिली. तसेच सदर सागरी महामार्गाच्या कामासाठी कोणकोणत्या विभागाकडून परवानगी देण्यात आली आहे त्याची सत्यप्रत मिळण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.

रायगड जिल्ह्यातील करंजा-रेवस ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डीपर्यंतच्या सागरी महामार्गाच्या कामाला शासनाने सुरुवात करण्याचा घाट घातला आहे. परंतु सदर सागरी महामार्ग हा ऐतिहासिक ठेवा असणाऱ्या द्रोणागिरी पर्वता जवळून जात असल्याने या सागरी महामार्गाच्या कामाला मौजे चाणजे प्रकल्प बाधित स्थानिक शेतकरी, करंजा ग्रामस्थ, जमीनधारक, सामाजिक कार्यकर्ते, कोंढरी ग्रामस्थ यांनी या अगोदरही विरोध दर्शविला आहे. त्यात करंजा नवापाडा येथील कोळी बांधव व ग्रामस्थ हे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी करंजा बंदरात मासेमारीचा व्यवसाय पिढ्यानपिढ्या करत आहेत. परंतु करंजा नवापाड येथील कोळी बांधव व ग्रामस्थांना विश्वासात न घेता शासनाने नियुक्त केलेल्या अफकाँन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने करंजा बंदरात आठ किलोमीटर लांबीच्या करंजा-रेवस या सागरी पूलाच्या महामार्गाच्या कामाला सुरुवात केल्याने त्याचा त्रास हा कोळी बांधव व ग्रामस्थांना सहन करावा लागत असून उदरनिर्वाहाचा प्रश्न गहन बनत आहे. त्यामुळे त्याचा जाब विचारण्यासाठी करंजा नवा पाडा ग्रामस्थांनी शनिवारी (दि. १७) करंजा बंदरात सुरु असलेल्या रेवस – रेड्डी या सागरी महामार्गाच्या कामावर धडक दिली. तसेच सदर सागरी महामार्गाच्या कामासाठी कोणकोणत्या विभागाकडून परवानगी देण्यात आली आहे त्याची सत्यप्रत मिळण्याची मागणी देण्यात आलेल्या निवेदन पत्रकातून केली आहे. यावेळी माजी चेअरमन के. एन. कोळी, कुंदन नाखवा यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
करंजा बंदरात मोठ्या प्रमाणात कोळी बांधव व ग्रामस्थ मासेमारीचा व्यवसाय करत आहेत. परंतु सदर बांधवांना विश्वासात न घेता शासनाने नियुक्त केलेल्या अफकाँन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने करंजा बंदरात उड्डाण पूलाचे काम सुरू केले आहे. त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित होत आहे. तरी आम्हाला विश्वासात घेऊन समुद्रात उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे काम करावे अशी आमची मागणी आहे. तसेच कोणकोणत्या विभागाकडून परवानगी देण्यात आली आहे त्याची सविस्तर माहिती आम्हा ग्रामस्थांना मिळावी, अन्यथा सदर पुलांचे काम बंद पाडण्यासाठी उग्र आंदोलन उभारले जाणार आहे.
-कुंदन नाखवा