• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अवकाळी पावसामुळे महाड-दापोली मार्गावर दोन अपघात

ByEditor

May 19, 2025

निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरणामुळे जीवितहानी होण्याचा धोका -सरपंच सोमनाथ ओझर्डे

मिलिंद माने
महाड :
महाड-दापोली मार्गावर शनिवारी झालेल्या एसटी बसच्या अपघातानंतर २४ तासाच्या आत पुन्हा दोन अपघात झाल्याने महामार्गावरील रस्त्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. या दोन अपघातात जीवितहानी झाली नसली तरी पावसाळ्यात निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरणामुळे जीवितहानी होण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता असून याला जबाबदार कोण? असा सवाल शिरगाव ग्रामपंचायतचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला विचारला आहे.

महाड-दापोली मार्गावर शनिवारी दुपारच्या सुमारास स्वारगेट एसटी डेपोच्या विन्हेरे-स्वारगेट या बसला करंजाडी बुद्धवाडी येथील रस्त्यावर झालेल्या अपघातात १५ प्रवाशांपैकी सात प्रवासी, चालक व वाहकासह जखमी झाले होते, या घटनेला २४ तासाचा कालावधी होण्याअगोदरच पुन्हा याच मार्गावर शिरगाव जवळील गोमंतक हॉटेलजवळ लग्नाचा सोहळा पार पडून येणारी इको कार (एमएच ०८ एएक्स १५४२) रस्त्यावरून घसरून अपघात झाला. मात्र यात सुदैवाने कोणी जखमी झाले नाही

महाड दापोली मार्गावर रेवताळे आंग्रेकोंड येथे टाटा कंपनीचा तुडील येथील आरिफ देशमुख यांचा मालवाहतूक करणारा टेम्पो रस्त्यावरून घसरून अपघात झाला. या घटनेत देखील कोणीही जखमी झाले नसले तरी रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या डांबरीमुळे हे अपघात घडत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

महाड दापोली मार्गावरील शिरगाव फाटा ते लाटवण फाट्यापर्यंतचा रस्ता असाच डांबरीकरणाच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे निसरडा झाला असल्याने पावसाळा सुरू होण्यापूर्वी अवकाळी पावसामुळे असे अपघात घडत आहेत, ऐन पावसाळ्यात या मार्गावर जर अपघात झाले तर याला जबाबदार कोण? असा सवाल शिरगाव ग्रामपंचायतचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी सार्वजनिक बांधकाम महाड येथील उपविभागीय अभियंता यांना विचारला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!