कांतीलाल पाटील
जासई : उरण येथे नुकत्याच सुरू झालेल्या उरण-नेरुळ हार्बर रेल्वेला उतरती कळा लागल्याचे दिसून येत आहे. उरण येथील हार्बर रेल्वे स्टेशनवरील दोन लिफ्टचे काम अपूर्ण आहे. स्टेशनचे तिकीट बुकींग कार्यालयाचे पूर्वेकडील स्वच्छतागृह सुरु असून पश्चिमेकडील स्वच्छतागृह बंद आहे. उरण स्टेशनवर लहान मुलांकरीता फिडिंग रुम अस्तित्वात नाही, तसेच स्टेशनची सफाई ४ ते ५ सफाई कामगारांमार्फत दुपारी व संध्याकाळी केली जाते. त्यामुळे प्रवाशांना धुळीचा सामना करावा लागतो.
स्टेशनमध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून सुरक्षा रक्षक याकडे लक्ष देत नाहीत. रेल्वे स्टेशनवर कॅन्टीनची सुवीधा नसून रिक्षा व्यवस्थाही अपूरी असून गर्दीचे वेळी प्रवाशांच्या लांबच लांब रांगा पहावयास मिळतात. रेल्वेच्या नियमाप्रमाणे रेल्वेच्या प्रत्येक स्थानकामध्ये ५ ते ६ सेकंद थांबण्याचा नियम असताना उरण रेल्वे स्थानकादरम्यान ३ ते ४ मिनिटे घेते. त्यामुळे प्रत्येक रेल्वे १० ते १५ मिनिटे उशीराने धावते. या प्रकाराने उरण येथील रेल्वे प्रवासी त्रस्त असून होणाऱ्या असुविधांच्या विरोधात आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे बोलले जात आहे.
