महाराष्ट्र सागरी मंडळाला गत वर्षात प्राप्त झाला साडेचार कोटीहून अधिक महसूल
अमुलकुमार जैन
अलिबाग : पावसाळा सुरू झाल्यामुळे, मुंबई गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा (गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा फेरी सेवा) पर्यंत प्रवासी वाहतूक सेवा तीन महिने बंद राहणार आहे. ही सेवा उद्यापासून २६ मे ते ३१ ऑगस्टपर्यंत बंद आहे. मात्र भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यान रो-रो बोट सेवा सुरू राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र सागरी मंडळाचे मांडवा बंदर निरीक्षक आशिष मानकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
मुंबई येथील गेटवे ऑफ इंडिया आणि मांडवा दरम्यान बोट सेवा आहे. ज्यामध्ये ही बोट सेवा पीएनपी, मालदार आणि अंजठा, अपोलो आदी प्रवासी शिपिंग कंपन्यांमार्फत सेवा पुरवली जात असून या एकूण ८५ बोटी आहेत. तर छोट्या प्रवासी बोटीची संख्या देखील ७० इतकी आहे. १ एप्रिल २०२४ते ३१ मार्च २०२५ दरम्यान वीस लाख दहा हजाराहून अधिक प्रवाशांनी बोट आणि रो-रो मधून प्रवास केला असल्याने महाराष्ट्र सागरी मंडळास ४ कोटी १० लाख रुपये तर रो-रो मधून येणाऱ्या वाहनाच्या माध्यमातून ५५ लाख ३८ हजार रुपयाचा महसूल मिळाला आहे.
महाराष्ट्र मरीन बोर्डाने प्रवासी शिपिंग कंपन्यांना समुद्री प्रवास बंद करण्याबाबत पत्र जारी केले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, पावसाळ्यात जलवाहतूक बंद ठेवली जाते. त्यानुसार, २६ मे ते ३१ ऑगस्टपर्यंत वाहतूक बंद राहील. मांडवा येथून गेटवे जलमार्गावर पीएनपी, मालदार, अजिंठा, अपोलो या बोटी प्रवासी सेवा देतात. खबरदारीचा उपाय म्हणून जलमार्ग बंद राहणार आहे.रो-रो बोट सेवा सुरू राहणार आहे. यामुळे प्रवाशांना काहिसा दिलासा मिळेल. मांडवा ते गेटवे जलवाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणावर वेळेची बचत होते. रस्ते मार्गे मुंबईत येण्यासाठी चार तासांहून अधिक वेळ लागतो. तर जलवाहतुकीमुळे अवघ्या तासाभरात मुंबईत पोहोचता येते.
26 मेपासून बंद करण्यात येणारी ही सेवा सप्टेंबर महिन्यात सुरू होईल. या काळात रो-रो बोट सेवा सुरू राहील. रो-रो बोट सेवा हिच्या साधारण दिवसाला चार आणि रविवारी पाच फेऱ्या होणार असल्याने काही प्रमाणात प्रवासात दिलासा प्राप्त होणार आहे. ही सेवाही हवामान कसे असेल त्यानुसार सुरू असणार आहे. त्यामुळे आता पुढचे तीन महिने प्रवाशांना जलवाहतूकीऐवजी रस्त्याचा पर्याय असणार आहे. पावसाळ्यात बंद राहणाऱ्या जलवाहतुकीचा अलिबाग आणि रायगडमधील पर्यटनावरही परिणाम होतो. मुंबईकरांना पर्यटनासाठी रायगडचे समुद्रकिनारे आवडतात. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून मांडवा येथे अनेक गोष्टी विकसित झाल्या आहेत.
