खोपोली : खोपोलीजवळील मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर शनिवारी 24 मे रोजी दुपारी चारच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. किलोमीटर 37 जवळ खोपोली फूड मॉलच्या अलीकडे मुंबई लेनवर एका बेकाबू ट्रेलरने सात वाहनांना जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 35 वर्षीय अश्विनी अक्षय हळदणकर आणि 17 वर्षीय श्रिया संतोष अवताडे यांचा समावेश आहे.

दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास महामार्गावर काही कारणास्तव वाहतूक थांबलेली होती. त्याच वेळी पुण्याकडून येणारा एक ट्रेलर नियंत्रण सोडून भरधाव वेगाने आला. या ट्रेलरने क्रमशः एक इर्टिगा, सियाझ, हुंडाई कार आणि एका एसटी बसला धडक दिली. यानंतर ट्रेलरने एका स्वीफ्ट कारला जोरात ठोकर दिली. त्या कारसमोर एक आराम बस उभी होती, त्यामुळे स्वीफ्ट कार थेट आराम बसच्या मागे जाऊन घुसली. या भीषण धडकेत कारमधील प्रवासी अक्षरशः चिरडले गेले. अपघातात स्वीफ्ट कारमधील अश्विनी हळदणकर व श्रिया अवताडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील अक्षय हळदणकर, वसुधा विजय जाधव (कोल्हापूर), सारिका अवताडे (घाटकोपर), 9 वर्षीय सारिका विजय जाधव, 3 वर्षीय अविनाश विजय जाधव हे सर्व गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघातामुळे पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच, महामार्ग पोलीस आय आर बी यंत्रणा, देवदूत यंत्रणा, खोपोली पोलीस आणि हेल्प फाउंडेशनची पथक घटनास्थळी दाखल झाली त्यांनी तातडीने मदत व बचाव कार्य सुरू केले. जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. यानंतर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. अपघातामागचे नेमके कारण कळू शकलेले नाही.
सातत्यानं पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघात होत आहेत. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघात होण्याची विविध कारणं आहेत. या महामार्गावर अनियंत्रित उतार आहे. टोकदार वळणे देखील आहे. तसेच यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. यावर तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे. अपघातांची संख्या व नियमित होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पुणे-मुंबईचा प्रवास हा अनेकांना नकोसा झाला आहे. जड वाहतूक, ओव्हरलोड वाहतूक, रस्त्याच्या कडेला होणारे वाहनांचे अवैध पार्किंग तसेच वाटेत बंद पडणारी वाहने, घाटात वाहने चालविणारे अकुशल चालक, निर्धारित वेगापेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे अशी अपघाताची विविध कारणे आहेत.
