विठ्ठल ममताबादे
उरण : महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायत कर्मचारी यांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित मागण्यांवर राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त सचिव मनोज गुप्ता, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे, नगरविकास विभाग प्रधान सचिव सोनिया सेठी, आयुक्त तथा संचालक डॉ. किरण कुलकर्णी असे उच्च पदस्थ आधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दि. २०/३/२०२३ रोजी विधान भवन येथे सकारात्मक निर्णय घेण्यात आले. परंतू २ वर्षे होऊनही या निर्णयांची अंमलबजावणी न झाल्याने विविध कामगार संघटनांनी सातत्याने याबाबत पाठपुरावा करित धरणे, मोर्चे, लॉंग मार्च असे विविध प्रकारे आंदोलने करण्यात आली. त्या-त्या वेळी इतिवृत्त तयार करण्यात आले, परंतू अपेक्षित अंमलबजावणी झालीच नाही.
यामुळे या प्रदिर्घ काळापासून प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी तसेच नगरविकास विभाग आणि वित्त विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मनातील नकारात्मक भूमिकेमुळे कर्मचारी, निवृत्त कर्मचाऱी वर्गाचे मोठ्या प्रमाणात होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी त्याच प्रमाणे महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीमधील हजारो कामगारांची अस्मिता जपण्यासाठी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कामगार कर्मचारी संघर्ष समितीचे मुख्य संघटक, कामगार नेते ॲड. संतोष पवार, उरण नगर परिषद व उत्तर महाराष्ट्र नगरपरिषद कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ. रामदास पगारे, मनमाड नगरपरिषद यांच्यावरील व इतर कामगार प्रतिनिधींवर रोषापोटी व सुडबुद्धीने हेतुपुरस्सर केलेली कारवाई त्वरित मागे घेण्यात यावी म्हणून सोमवार, दि. २६ /५/२०२५ रोजी महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीचे नेते काॅ. डॉ. डी. एल. कराड, ॲड. सुरेश ठाकूर, रामगोपाल मिश्रा, रामेश्वर वाघमारे, ॲड. सुनील वाळूंजकर, अनिल जाधव, अनिल पवार, आण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान मुंबई येथे कॉ. संतोष पवार (उरण) व कॉ. रामदास पगारे (मनमाड) हे आमरण उपोषणास बसणार आहेत.
