उरणमधील कुट्टी परिवारातील सदस्य सुदैवाने बचावले!
विठ्ठल ममताबादे
उरण : तालुक्यातील बोरी पाखाडी हुसेन मंजिल येथे राहणारे इकबाल अहमद कुट्टी, रुबीना इकबाल कुट्टी (पत्नी), नोफ एकबाल कुट्टी (मुलगी), अजीझा इकबाल कुट्टी (मुलगी), उमर इकबाल कुट्टी (मुलगा) हे सर्वजण एका कुटुंबातील सदस्य २१ मे रोजी रात्री केरळ येथे जाण्यास निघाले. त्यांनी रत्नागिरी गोवा मंगलोर असे फिरत प्रवास केला होता. शुक्रवार, दि. २३ मे २०२५ रोजी मारुती ईर्टिगा (क्र. MH 46 CV 6557) या कारने प्रवास करत असताना कासरगोड चरकाला या ठिकाणी सकाळी ५:३० वाजता कारमधून अचानक धूर येऊ लागला.
रुबीना कुट्टी या कार चालवत होत्या. धूर येऊ लागल्याने रुबीना यांनी कार बाजूला पार्किंग केली. कारमधून अचानक सर्वजण बाहेर पडले. सुरक्षित ठिकाणी एका बाजूला सर्वजण उभे राहिले. यामुळे सर्वांचे प्राण वाचले. या घटनेत कारला आग लागून कारचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. सदर घटनेबाबत इकबाल कुट्टी व त्यांच्या परिवाराने कासारगोडे जिल्ह्यातील विद्यानगर येथील पोलीस ठाण्यात माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने कलम ३०६(१)(C)(FA) अंतर्गत FIR नोंदवून घेतला आहे. सदर वाहनाला आग लागल्याची घटना कशामुळे घडली? आग कशी लागली? याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.